नंदकुमार ढेरे --चंदगड --जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाही आणि वारसदारांना झिडकारून धक्कादायक निकाल दिला. तालुक्याच्या इतिहासात गेली ४० वर्षे निष्ठेचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना या निवडणुकीचा निकाल अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. भाजपच्या साथीने राष्ट्रवादीला उभारी घेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरली. ‘भाजप’चे कमळ फुलण्यास मोठी संधी असतानाही मतदारांनी गोपाळराव पाटील यांच्या परडीत मताचा कौल दिला नाही. शिवसेना व अप्पी पाटील यांची चांगली बांधणी होत आहे, हे या निकालावरून दिसून आले.चंदगडच्या इतिहासात तालुक्याच्या राजकारणावर माजी आमदार कै. नरसिंगराव भुजंगराव पाटील, माजी आमदार कै. व्ही. के. चव्हाण-पाटील, माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील यांची सत्ता होती. १९७५ पर्यंत तालुक्यात शेकाप व काँगे्रस या दोनच पक्षांचे राजकारण चालत आले. १९८० नंतर यात बदल होऊन भरमूअण्णा गट, नरसिंगराव गट, व्ही. के. चव्हाण-पाटील या गटांचेच राजकारण चालत आले. तालुक्याच्या राजकारणावर गटाचे व एकनिष्ठेचा प्रभाव मोठा होता. जि. प. निवडणुकीत काँगे्रस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, दौलत विकास आघाडी या सर्वच पक्षांनी निवडणूक लढविली. पण, खरी लढत झाली ती काँगे्रस व युवक क्रांती आघाडी यांच्यातच. माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी आपली स्नुषा ज्योती पाटील, माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव महेश पाटील यांना पुन्हा एकदा काँगे्रस पक्षातून निवडणुकीत उतरविले होते. बदलत्या राजकीय प्रवाहात घराणेशाहीला जपण्याचा आरोप या नेत्यांवर झाला. शिवाय निष्ठेच्या राजकारणात कार्यकर्ते कधी इतर पक्षात विखुरले हे या नेत्यांना कळलेच नाही. काँगे्रसचे सर्व उमेदवार निवडून येतील, अशी व्यूहरचना भरमूअण्णा, राजेश पाटील यांनी रचली होती. पण, त्यांना शेवटपर्यंत टिकविता आली नाही. शिवसेनेनेही यावेळी प्रथमच आपले पॅनेल पूर्ण ताकदीनिशी उतरविले होते. त्यांचे प्रयत्नही अपुरे पडले. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या दौलत विकास आघाडीनेही बऱ्यापैकी मते मिळविली. गोपाळराव पाटील यांनी भाजपमधून पुत्र विशाल यांचा राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्नही मतदारांनी उधळून लावला. याउलट अंतर्गत भांडणामुळे बॅकफूटवर असलेल्या राष्ट्रवादीने भाजप व स्वाभिमानीशी संगत करून पं. स.वर सत्ता मिळविली. चंदगड तालुक्यात गोपाळरावांना ‘भाजप’चे कमळ फुलविण्याची संधी असतानाही त्यांना ते शक्य झाले नाही. स्वाभिमानीचे जगन्नाथ हुलजी यांच्या रूपाने तालुक्यात प्रथमच पं. स.मध्ये स्वाभिमानीने प्रवेश केला.या निवडणुकीत युवक क्रांती आघाडीला ३१.२८ टक्के मिळाली. काँगे्रसला ३१.१० टक्के, शिवसेना २२.३८ टक्केदौलतविकास आघाडीने १०.४४ टक्के इतर ३.७७ टक्के नोटाने १.०३ टक्के मते मिळविली.
भाजपचे कमळ फुललेच नाही-- चंदगड जिल्हा परिषद
By admin | Published: February 24, 2017 10:47 PM