समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपचा पसारा वाढला, ताकद वाढली. मात्र त्या मानाने सध्याचे त्यांचे बिंदू चौक सबजेलजवळील कार्यालय मात्र अपुरे पडत आहे. नित्यनेमाने होणारी वाहतुकीची कोंडी ही इथली प्रमुख अडचण असल्याने नियोजित भाजपचे पाच मजली सुसज्ज कार्यालय कधी होणार, याची आता कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपची फारशी ताकद नव्हती, ही वस्तुस्थिती आहे.
कोल्हापूर शहर, आजरा आणि मलकापूर परिसरांत अधूनमधून भाजपची मंडळी कुठल्या तरी सत्तेत असलेली दिसायची. आजऱ्यात उपसभापतिपदापर्यंत आणि जिल्हा परिषदेत के. एस. चौगुले यांच्या रूपाने बांधकाम समिती सभापतिपदापर्यंत भाजपने झेप घेतली. युतीचे शासन आल्यानंतर भाजपसाठी कार्यालय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.बिंदू चौकातील सबजेलजवळ प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचा वाडा होता. तो पाडून व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या पहिल्या मजल्यावरील एक सदनिका भाजप कार्यालयासाठी घेण्याचे निश्चित झाले. ५ एप्रिल २००० रोजी माजी दुग्धविकास राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते आणि महापौर बाबू फरास, दादासाहेब सांगलीकर, कर्नल शंकरराव निकम, विनित कुबेर, सुभाष वोरा यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बाबा देसाई हे जिल्हाध्यक्ष होते, तर बापूसाहेब मासाळ जिल्हा सरचिटणीस होते.या ठिकाणी असणाऱ्या छोट्या सभागृहामध्ये सध्या शहर आणि जिल्ह्याच्या अनेक बैठका होतात. ७५ ते ८० जण बसतील एवढी जागा या ठिकाणी आहे; परंतु त्यापेक्षा अधिक संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले की मग मात्र येथे अडचण होते आणि अनेकांना गॅलरीमध्ये उभे राहावे लागते. या ठिकाणी पक्षाचे छोटे कार्यालयही आहे.सगळ्यांत मोठी अडचण म्हणजे हा रस्ता रहदारीचा आहे. भवानी मंडपाकडून बिंदू चौकाकडे जाणारी एकेरी वाहतूक येथून होत असल्याने इथे नेहमी वाहनांची वर्दळ असते. अशातच सत्तेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या चार, पाच चारचाकी गाड्या येऊन लागल्या की येथे वाहतुकीची कोंडी ठरलेली. त्यामुळे भाजपच्या पत्रकार परिषदेला गेलेल्या पत्रकारांनाही आपल्या गाड्या कुठे लावायचा, हा अनेकदा प्रश्न पडतो.
परंतु जिल्हा कार्यालयाचे महत्त्व ओळखून पक्षाने सत्ता नसतानादेखील कुणाच्या तरी घरामध्ये कार्यालय सुरू करण्यापेक्षा पक्षाचे स्वतंत्र कार्यालय खरेदी करण्याचा त्यावेळी घेतलेला निर्णय दूरदृष्टीचा होता यात शंका नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी या कार्यालयामध्ये उपस्थिती दर्शवली आहे.आता भाजपने नवीन सुसज्ज असे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खानविलकर पेट्रोल पंपासमोर ही जागा आहे. या ठिकाणी पाच मजल्यांचे कार्यालय, एका मजल्यावर नेत्ररुग्णालय असे नियोजन असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे आता भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नव्या कार्यालयाच्या प्रतीक्षेत आहेत.