दत्ता बिडकर ---हातकणंगले तालुक्यामध्ये भाजपाने जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या सहा जागा जिंकून प्रथमच जोरदार मुसंडी मारली आहे. हातकणंगले पंचायत समिती वर भाजप-जनसुराज्यचा झेंडा फडकला आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आणि आवळे- आवाडे गटाअंतर्गत विकोपाला गेलेल्या संघर्षामध्ये तालुक्यात काँग्रेस भुईसपाट झाली आहे. मात्र, आवाडे गटाने स्वाभिमानी व शिवसेनच्या साथीने पक्षातील विरोधकांसह भाजप आघाडीला चारीमुंड्या चित केले.तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू होते. हे इनकमिंग भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाले आहे. भाजपने जिल्हा परिषदेच्या हातकणंगले, शिरोली, कोरोची, कबनूर आणि हुपरी या पाच जागा जिंकून तालुक्यात सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. या पाच जागा जिंकताना गतवेळच्या शिरोली, कबनूर, कोरोची या जागा कायम राखल्या. हातकणंगले आणि हुपरी या दोन जागा नव्याने मिळविल्या आहेत. वरीलपैकी तीन जागा भाजपमध्ये इनकमिंग झालेले अरुण इंगवले (हातकणंगले), प्रसाद खोबरे (कोरोची) आणि स्मिता शेंडुरे (हुपरी) यांच्यामुळे मिळाल्या आहेत. मात्र, हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघात अरुण इंगवले म्हणजे कोणताही पक्ष नाही, तर इंगवले म्हणजेच पक्ष हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघात अरुण इंगवले जिल्हा परिषदेला विजयी झाले आहेत, तर या मतदारसंघातील दोन्ही पंचायत समितींच्या हातकणंगले जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व सावर्डे पंचायत समितीवर काँग्रेस विजयी झाल्यामुळे अरुण इंगवले यांचा विजय स्वत:च्या ताकदीवर आणि क्रॉस व्होटिंगमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तालुक्यात जनसुराज्यने आपल्या जिल्हा परिषदेच्या दोन जागा कायम राखताना घुणकी ही जागा काँग्रेसकडून हिसकावून घेतली, तर कुंभोजची हक्काची जागा चुकीच्या उमेदवारीमुळे गमावली. पंचायत समितीच्या राजकारणात गतवेळचे पाच जागांचे संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. त्यामुळे भाजपच्या साथीने हातकणंगले पंचायत समितीमध्ये जनसुराज्य सत्तेचा वाटेकरी ठरणार आहे.शिवसेनेने तालुक्यात कुंभोज जिल्हा परिषदेची जागा मिळविली आहे. मात्र, रेंदाळची जागा गमावली आहे. यामुळे शिवसेनेचे संख्याबळ एकच राहिले आहे. शिवसेनेने पंचायत समितीच्या रुकडी आणि पट्टणकोडोली या दोन जागा जिंकल्या आहेत. भाजप- जनसुराज्य आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी एक जागा कमी पडत असल्याने शिवसेना ही उणीव भरून काढण्याची शक्यता आहे.तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिल्या प्रयत्नात मोठा गड सर केला आहे. जिल्हा परिषदेचे खाते पारंपरिक विरोधक असलेल्या रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून उघडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सभापती राजेश पाटील यांना आपल्याकडे खेचून त्यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन या मतदारसंघात इतिहास घडविला आहे. पद्माराणी पाटील यांच्यामुळे स्वाभिमानीचे तालुक्यात खाते उघडले आहे. पंचायत समितीमध्ये स्वाभिमानीने प्रथमच तीन जागा जिंकून आपण किंगमेकर ठरू शकतो, असे वातावरण निर्माण केले आहे. भाजप- जनसुराज्य आघाडीला कमी पडणाऱ्या जागा स्वाभिमानी भरून काढू शकते.काँग्रेसमध्ये आसलेली गटबाजी या निवडणुकीत उफाळून आली. माजी खासदार जयवंतराव आवळे आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या भांडणामुळे तालुक्यात काँग्रेस मात्र भुईसपाट झाली. गतवेळी दोन जिल्हा परिषदा आणि आठ पंचायत समितीच्या जागा जिंकणारी काँग्रेस यावेळी भोपळाही फोडू शकली नाही. काँग्रेसच्या या अंतर्गत वादाचा आणि कलहाचा तोटा थेट माजी खासदार जयवंतराव आवळे यांना झालेला आहे.तालुक्यात प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस विरुद्ध बंड पुकारले आणि जिल्हा परिषदेच्या पाच जागांवर कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी तयार करून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेबरोबर समझोता घडवून ‘एकला चलो’चा नारा देत रेंदाळची प्रतिष्ठित लढत जिंकून भाजपसह काँग्रेस पक्षातील विरोधकांना धडा शिकविला. आवाडे यांनी दोन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समितींच्या जागा जिंकून सर्वांचीच बोलती बंद केली.तालुक्यात कै. माजी खासदार बाळासाहेब माने यांचा मोठा गट आहे. या गटाच्या ताकदीवर माजी खासदार निवेदिता माने दोनवेळा खासदार झाल्या, तर धैर्यशील माने आलास (शिरोळ) आणि पट्टणकोडोली (हातकणंगले) या दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेले.यावेळी त्यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हा नेतृत्व आमदार हसन मुश्रीफ, तसेच माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावर तोफ डागत राष्ट्रवादी सोडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर समझोता करून युवक क्रांती आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आसलेल्या रुकडी आणि पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक लढविली. मात्र, दोन्ही ठिकाणी त्याना पराभव पत्करावा लागला. रुकडी मतदारसंघामधून धैर्यशील माने यांनी पत्नी वेदांतिका यांच्यासाठी जिवाचे रान केले. तसेच माजी खासदार निवेदिता माने यांनी सूनबाईसाठी प्रयत्न केले. मात्र, माने घराण्याचा पराभव पारंपरिक विरोधक स्वाभिमानीच्या उमेदवाराकडून झाला. सभापतिपदासाठी मोर्चे बांधणीहातकणंगले पंचायत समितीचे सभापती पद नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहे. तालुक्यातील कबनूर (पूर्व), हुपरी (उत्तर) आणि हेरले हे तीन मतदारसंघ या प्रवर्गासाठी आरक्षित होते. कबनूर (पूर्व)मधून भाजपच्या रेश्मा पापालाल सनदी, हुपरी (उत्तर) मधून भाजपच्या वैजयंती आंबी या प्रमुख दावेदार आहेत. हेरलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेहरनिगा जमादार निवडून आल्या आहेत. भाजप-जनसुराज्य आघाडीला एक जागा कमी पडत आहे. जर भाजप आघाडीने स्वाभिमानीचा पाठिंबा मिळविला, तर हेरले गावाला जयश्री कुरणे, राजेश पाटील यांच्यानंतर सभापतिपदाची संधी मिळू शकते.हातकणंगले पंचायत समितीमध्ये भाजपने ६, जनसुराज्यने ५ अशा एकूण ११ जागा जिंकल्या आहेत. प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीने ५, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 3 आणि शिवसेनेने २ जागा जिंकल्या आहेत. जयवंत आवळे यांच्या काँग्रेसने फक्त १ जागा जिंकली आहे
हातकणंगलेत ‘भाजप’ची जोरदार मुसंडी-जिल्हा परिषद विश्लेषण
By admin | Published: February 24, 2017 9:37 PM