कोल्हापूर : माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे बोलणे म्हणजे बिनपुंगळीची लुना... या लुनाला ना गती, ना प्रगती... ती नुसतेच पेट्रोल खाते... आंबा पाडल्यानंतर कुणी मोठे होत नाही. आंबा पाडणाराच घरी बसतो, असे प्रत्युत्तर भाजपने मंगळवारी दिले.
क्षीरसागर यांनी सोमवारी (दि. २७) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. आंबा पडल्यासारखे त्यांना हे पद मिळाल्याचे ते म्हणाले होते. त्याला सचिन तोडकर यांनी प्रसिद्धिपत्रक काढून प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, आंबा पाडायची संस्कृती कोणाची आहे हे शहरातील डॉक्टर्स, बिल्डर्स, व्यापारी, उद्योगपती यांना चांगलीच माहिती आहे. म्हणूनच लोकांनी कुजका आंबा फेकून दिला.
चंद्रकांत पाटील व नारायण राणे यांच्यावर टीका करून विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठीच मातोश्रीला खुश करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यापेक्षा आपल्या घराशेजारील शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आणून दाखवावेत. चंद्रकांत पाटील स्वकर्तृत्वाने मोठे झाले आहेत.
त्यामुळे पायदळी कोण जातंय हे येणारा काळच ठरवेल. त्यासाठी आपल्याला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. आपल्या आंबा पाडण्याच्या संस्कृतीमुळेच आपले पक्षातील जिल्हाप्रमुखांशी पटले नाही. भाजपच्या कोणत्या नेत्यांवर टीका केल्यास त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल.