कुडाळ : भाजपने मुंबई महापौरपदासाठी उमेदवार दिला नाही, कारण शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल आणि सरकारही कोसळेल अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत होती. त्यामुळे आपली खुर्ची टिकविण्यासाठी महापौरपदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर व पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रीय काँग्रेसने झेंडा फडकवित विजय संपादन केल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने कुडाळ येथील नवीन एस.टी. डेपोच्या मैदानावर विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व आमदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सदस्य रणजित देसाई, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, विकास कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य अकुंश जाधव, काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष दिनेश साळगांवकर, संदीप कुडतरकर, (पान १० वर) रत्नप्रभा वळंजु तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व नवनिर्वाचित काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयाचे शिलेदार या जिल्ह्यातील प्रामाणिक मतदार, कार्यकर्ते आहेत. प्रामाणिक मतदारांमुळे काँग्रेसला प्रवाहाच्या विरोधातही विजय मिळाला. भाजप घोषणा करते, जाहिराती, मोठे लेख प्रसिद्ध करते, अच्छे दिन आल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. रांगेत राहून अनेकांचे जीव गेले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, महागाई वाढली, कर लादले जातात, उपासमारी वाढत आहे. तरीही हे सांगतात आम्ही नंबर एकवर आहोत. पाच, दहा हजार देऊन पाच वर्षे सत्तेता वापर करत आहेत. या मेळाव्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, विकास सावंत, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
सत्ता जाण्याच्या भीतीने भाजपची माघार
By admin | Published: March 05, 2017 12:36 AM