कोल्हापूर : काँग्रेस आघाडी सरकारने गोरगरीब, अपंग व वृद्धांसाठी सुरू केलेली पेन्शन बंद करण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. त्यामुळे जनता भाजपला माफ करणार नाही. महागाईने गोरगरीब जनता पुरती हबकून गेली आहे. सर्वसामान्यांची डाळ महाग करणाऱ्यांची डाळ कोल्हापुरात शिजणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कसबा बावडा येथील सभेत ते बोलत होते.हंडोरे म्हणाले, अच्छे दिनचे गाजर दाखवून भाजपने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली; पण गेल्या वर्षभराच्या काळात या सरकारने गोरगरिबांसाठी काहीही केले नाही. समाजातील वंचित, गरजू लोकांपेक्षा उद्योगपतींसाठी हे सरकार काम करीत आहे. अच्छे दिन छोडो, पुराने दिन लौटा दो, असे म्हणायची वेळ जनतेवर आली आहे. ऋतुराज पाटील म्हणाले, सतेज पाटील यांनी आजपर्यंत युवकांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. प्रत्येक माणसासाठी सदैव तप्तर राहून त्यांनी प्रामाणिकपणे कामे केली. यावेळी डॉ. संदीप नेजदार, मोहन सोलपे, विष्णुपंत सरनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वास नेजदार, सुनीता हवालदार, शिवाजी कांबळे, बाळासाहेब शिरसाट, सुभाष गदगडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पेन्शन बंद करण्याचे पाप भाजपचे
By admin | Published: October 27, 2015 12:32 AM