राजाराम कांबळे ल्ल मलकापूरशाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे धुमशान चालू झाले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध जनसुराज्य-कॉँग्रेस, भाजप आघाडी मैदानात उतरली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष व मनसे उमेदवार उभे केल्याने तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने काही ठिकाणी आपल्या चिन्हाला रामराम ठोकला आहे.शाहूवाडी तालुक्यात पक्षापेक्षा गटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालत आहे. आपली सोय पाहून येथील नेतेमंडळींनी आपले राजकारण सुरू ठेवले आहे. नेत्यांबरोबर जनतादेखील राजकीय आघाड्या या बदलाचे वारे असे समजून त्याला संमती देत आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत शित्तूर वारुण जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते मानसिंगराव गायकवाड यांचे पुत्र रणवीरसिंग गायकवाड शिवसेना व राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित आहेत. मात्र, रणवीरसिंग यांनी ‘घड्याळ’ चिन्हाला रामराम ठोकून ‘सेने’चा धनुष्य हातात घेतला आहे. त्यांच्या विरोधात जिल्हा बॅँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर ‘नारळ’ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. त्यांना कॉँग्रेस, भाजप या आघाडीने पाठिंबा दिला आहे. पिशवी मतदारसंघ हा दोन्ही गायकवाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे कॉँग्रेस-जनसुराज्य पक्षांच्या जनसेवा आघाडीच्या माध्यमातून माजी उपसभापती महादेव पाटील निवडणूक लढवित आहे. सरुड जिल्हा परिषद मतदारसंघात सेनेचे हंबीरराव पाटील ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर लढत असून, त्यांच्या विरोधात ‘जनसुराज्य’चे अक्षय पाटील यांनी आघाडी उघडली आहे. करंजफेण महिलांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात जनसुराज्यकडून दीपाली सोरटे विरुद्ध सेनेच्या आकांक्षा पाटील यांच्यात लढत होणार आहे.राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची सत्ता असली तरी दोघांचे पटत नाही. यामुळे या निवडणुकीत भाजपने जनसुराज्य व कॉँग्रेसला आपला पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष व मनसेने आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांनीदेखील आपल्या पक्षाचे विचार जनमाणसांत रुजविण्यासाठी आघाडी उघडली आहे. इतर संघटनांनी आपल्या सोयीनुसार प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात आपली वेगळी भूमिका ठेवली आहे.
शाहूवाडीत जनसुराज्य, कॉँग्रेसला भाजपचे बळ
By admin | Published: February 13, 2017 11:50 PM