कोल्हापूर - काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या‘भारत जोडो’ यात्रेला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी या यात्रेची मदत होईल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. ते कोल्हापूरमध्ये रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या यात्रेवरही टीका झाली. परंतू, राहूल गांधींची यात्रा केवळ काँग्रेसपुरती राहिली नाही. महाराष्ट्रात जयंत पाटील, सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. गांधी विचार मानणाऱ्या संस्था, संघटनाही सहभागी झाल्या. सामान्यांनी या पदयात्रेला चांगला प्रतिसाद दिल्याने भाजपने त्यांच्याविषयी केलेल्या दूषित वातावरणाला चांगले उत्तर मिळाले.
राज्यातील आरोप प्रत्यारोपांचा दर्जा घसरत आहे. यावर ते टाळण्यासाठी सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, हे काही थांबणार नाही. परंतू सत्तेवर आल्यानंतर पाय जमीनीवर हवेत. तुरूंगात घालीन, जामीन रद्द करतो ही राजकीय नेत्यांची भूमिका असू शकत नाही. कोणीही टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. राज्यपाल कोश्यारी हे त्या पदावर नाशुष आहेत. असा प्रश्न विचारला असता, राज्यापालांविषयी आम्हीही नाखूश आहोत, असा मिश्कील टोला पवार यांनी लगावताच पत्रकारांमध्ये मोठा हशा पिकला. उत्तम राज्यपालांची महाराष्ट्राला पंरपरा होती. परंतू हे असे पहिले राज्यपाल आहेत की ज्यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यांनी पदाची प्रतिष्ठा राखली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राम मंदिर कधी बांधून पूर्ण होणार हे पुजाऱ्यांनी सांगणे अपेक्षित असताना त्यांचे काम गृहमंत्री करत आहेत असा टोलाही पवार यांनी अमित शहा यांना लगावला. लोकांच्या मुख्य प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे पुढे आणले जात आहेत.यावेळी माजी मंत्री सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास, अनिल कदम, महेंद्र चव्हाण, जयकुमार शिदे, किसन कल्याणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले
१ सीमाप्रश्नी उत्तम वकील देवून सर्वोच्च न्यायालयात मजबूतपणे बाजू मांडावी अशी अपेक्षा. जातनिहाय जनगणना व्हावी ही आमचीही मागणी. नितीशकुमार यांचे याबद्दल अभिनंदन.
२ सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले का याची माहिती घेतो.
३ संभाजीराजे यांना स्वराज्यरक्षक म्हणण्यात काहीही चुकीचं नाही.
४ पैलवान उत्तेजक द्रव्ये घेत असल्याच्या प्रकाराची माहिती नाही.
५ महाविकास आघाडी आरपीआयच्या काही गटांसह इतरांना सोबत घेवुन निवडणुका लढवण्यात फारशी अडचण येणार नाही.
शिंदेंकडे गेलेल्यांना जनतेच्या भावना लक्षात येतील
जरी उध्दव ठाकरे यांच्यापासून काहीजण बाजुला गेले असले तरी कडवा प्रत्यक्षात काम करणारा शिवसैनिक ठाकरे यांच्याबरोबरच आहे असे माझे निरीक्षण आहे. याला कोल्हापूरही अपवाद नाही. त्यामुळे जे खासदार, आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत त्यांना येणाऱ्या निवडणुकांवेळी जनतेच्या भावना काय आहेत हे लक्षात येईल असे पवार म्हणाले.