कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य सरकार आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित कृती समितीने शिक्षक दिनी आज, सोमवारी काळा दिवस पाळला. अन् कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलनाद्वारे निषेध नोंदविला. मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा दि. २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.त्रुटी पूर्तता केलेल्या सर्व शाळा, अघोषित असणाऱ्या सर्व शाळांना घोषित करून सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे. २० टक्के व ४० टक्के घेणाऱ्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवा संरक्षण द्यावे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी विनाअनुदानित कृती समितीद्वारे आंदोलन करण्यात आले. समितीचे पदाधिकारी, सदस्य शिक्षकांनी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा दिल्या.शिक्षण सहसंचालक सुभाष चौगुले यांना समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, एस डी लाड, दादा लाड, डी एस घुगरे आनंदा वारंग, जनार्दन दिंडे, गजानन काटकर, शिवाजी घाटगे, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे, गौतमी पाटील, शिवाजी कुरणे, बाबा पाटील, राजेंद्र कोरे, सी. एम. गायकवाड, आदी उपस्थित होते.वेदनांवर अजुन किती मीठ चोळणार?गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक दिनी राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी आपल्या न्याय हक्कासाठी विविध प्रकारची आंदोलने केली. शिक्षक दिन हा काळा दिवस म्हणून पाळावा लागला. शासन आमच्या वेदनांवर अजून किती मीठ चोळणार अशी विचारणा जगदाळे यांनी केली. आम्हाला तत्काळ न्याय द्यावा, अन्यथा विनाअनुदानित समिती यापुढे कसल्याही आश्वासनाची वाट न पाहता २ ऑक्टोबरपासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करेल, असा इशारा त्यांनी दिला.
'शिक्षक दिनीच' कोल्हापुरात विनाअनुदानित सरांनी पाळला 'काळा दिवस'
By संतोष.मिठारी | Updated: September 5, 2022 14:22 IST