पेठवडगाव : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका लोकप्रतिनिधीसह त्याच्या कुटुंबीयांच्या फोटोला बाबळीच्या झाडावर खिळे मारून, लिंबू ,बाहुली ठोकून जादुटोणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगावमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली. वडगाव नगरपालिकेचा कार्यकाल संपला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. याच दरम्यान गावात अघोरी प्रकार समोर आला. देवगिरी पेट्रोलपंपाजवळ असणाऱ्या शेताचे मालक धनाजी खिलारे हे शेतात जेसीबी यंत्राने सफाई करत होते. यावेळी बाभळीच्या झाडावर एका लोकप्रतिनिधीसह कुटुंबीयांच्या फोटोला खिळे मारून, लिंबू ,बाहुली ठोकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकारानंतर गावात भितीचे वातावरण पसरले. तर सोशल मिडियावर या प्रकारांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत होता. या प्रकाराची गावात दिवसभर चर्चा रंगली होती.याबाबत धनाजी खिलारे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देणार असल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी करावी. तसेच अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.