लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शेतीमालाला हमीभाव द्यावा, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करण्यास मुख्यमंत्र्यांना सांगावे, शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करून त्यांच्या आत्महत्या रोखाव्यात, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आमदार सुरेश हाळवणकर यांना छत्रपती शाहू पुतळा चौकात देण्यात आले.निवेदनात आमदारांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सद्य:परिस्थिती सांगून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत मागणी करावी. भाजप सरकारने भांडवलदारांना लाखो रुपये सवलत दिली आहे आणि कमजोर घटकाला मात्र मजबूत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. शब्दांचे खेळ करून वारंवार आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करीत आहे. त्यामुळे सरकारबद्दल चीड निर्माण होत असून, खरोखरच सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असेल, तर शेतकऱ्यांच्या हिताचा ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, आमदार हाळवणकरांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार होता. या पार्श्वभूमीवर घर व कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, हाळवणकर यांनी आंदोलनकर्ते जमणार असलेल्या ठिकाणी शाहू पुतळ्याजवळ येऊन निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर शाहू पुतळ्याजवळ जाऊन निवेदन स्वीकारले. यावेळी किसान सभेचे सुभाष निकम, नारायण गायकवाड, राजू शिंदे, विनायक दंडके, आक्काताई तेली, उत्तम साळुंखे, अरुण मांजरे, रमेश शिंदे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाठार येथे संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोकोभादोले / नवे पारगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेती मालाला हमीभाव मिळावा यांसह अन्य मागण्यांबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे संभाजी ब्रिगेड, सकल मराठा समाजाच्यावतीने वाठार-वारणानगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाठार कमानीलगतच सकाळी अकराच्या सुमारास बैलगाडी आडवी लावून वाठार-वारणानगर रस्ता रोखून धरला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. यावेळी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, आदी मागण्यांचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी चिमाजी दबडे, विवेक पाटील, हणमंत पाटील, गोरख शिंदे, संतोष ताईंगडे, मच्छिंद्र पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. वाठारचे सरपंच राजकुमार शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी खोत, हातकणंगले तालुकाध्यक्ष अमोल परीट, राहुल पाटील, शिवाजी पाटील, मारुती पाटील, लखन मुसळे, सागर पाटील, मच्छिंद्र पाटील, विजय माने, योगेश पाटील, सुनील शिंदे, सर्जेराव गायकवाड, रमेश इंगवले, योगेश क्षीरसागर, संजय चव्हाण, रमजान पटाईत, बाळकृष्ण पाटील यांच्यासह भादोले, मिणचे, पेठवडगाव, किणी, घुणकी, तळसंदे, पारगाव परिसरातील कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. पेठवडगावचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हमीभावासह सातबारा कोरा करा
By admin | Published: June 08, 2017 1:15 AM