कोल्हापूर : रंकाळा प्रदूषणप्रश्नी निर्माण कंपनीने मंगळवारी हरित लवादाकडे हजर होऊन रंकाळा तलावात खरमाती टाकल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही, असा पवित्रा घेत चक्क कानावर हात ठेवले व म्हणणे देणेसाठी मुदत मागितली; परंतु मुदतीची मागणी समर्थनीय नसल्याचे हरित लवादाने फटकारले. दि. १७ आॅगस्टपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश कंपनीला दिले. सुनील केंबळे यांनी दाखल केलेल्या अर्जावर राष्ट्रीय हरित लवादाच्या न्या. जावाद रहिम व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांचे खंडपीठासमोर सुनावणी झाली. महापालिकेतर्फे युक्तिवाद करताना वकील धैर्यशील सुतार यांनी निर्माण खासगी बांधकाम कंपनीचा आपणास काहीच माहिती नसल्याचा दावा साफ खोटा असून दि. २४ एप्रिलला कंपनीला महापालिकेने नोटीस बजावून रंकाळा परिसरात टाकलेली खरमाती ही रंकाळा प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे तसेच दंडात्मक कारवाई का करू नये, ह्याबद्दल खुलासा मागविला आहे पण त्याचे कंपनीने कोणतेही उत्तर दिले नसल्याचे राष्ट्रीय लवादाच्या निदशर्नाला आणून दिले. त्यावर निर्माण कंपनीच्या वकिलांनी म्हणणे देण्यासाठी मुदत मागितली परंतु लवादाने कंपनीच्या वकिलांना फटकारले व मुदतवाढ मागणे समर्थनीय नसल्याचे सांगितले परंतु फक्त न्यायोचित कारणासाठी १७ तारखेपर्यंत म्हणणे सादर करण्यासाठी मुदत दिली. (प्रतिनिधी)
निर्माण कंपनीला हरित लवादाने फटकारले
By admin | Published: August 03, 2016 1:01 AM