आंबा : चरस, गांजापासून ते जुगार, सावकारी यातून होणारे वाद नि आता विशिष्ट मंडळींच्या दादागिरीमुळे विशाळगडसारख्या ऐेतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला गालबोट लागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाचे अभय येथील व्यवस्थेला मिळत असल्याने येथील व्यावसाईक अडचणीत सापडले आहेत.
छोट्याशा कारणावरून पर्यटकांना बेदम मारहाण करून त्यांना वेठीस धरून खोट्या तक्रारीची धमकी देणारी मानसिकता येथे रूजत आहे. विशाळगडावर पोलीस औट ठाणे मंजूर आहे, पण येथे पोलीस नसतात. उरूस, महाशिवरात्रीला तेवढी हजेरी असते. दोन वर्षांपूर्वी दारूबंदीच्या मोहिमेतून येथे येणाऱ्या पर्यटकांची झडती घेतली जात होती; त्यातून वाद होऊन आठवड्याला मारामाºया होत होत्या. त्यातून काहींची लूबाडणूक होत होती, म्हणून येथील दारूबंदी उठविली गेली. मात्र, काही मंडळी पर्यटकांना कोणत्याही कारणाने अडवून त्यांची पिळवणूक करत आहेत.
महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री मिरज येथील तरुणांना मारहाण झाली. त्यानंतर शासकीय कर्मचाºयांवर जमावाचा हल्ला झाला. सोमवारी दुपारी पायथ्याला उगार येथील पर्यटकाला माजी उपसरपंच असलेल्या एका जबाबदार व्यक्तीने गाडीला झेंडा लावला म्हणून मारहाण केली. ज्याच्या मांडवात पार्किंग केले, त्या स्थानिक व्यावसायिकालाही मारहाण करून दहशत माजवली. मात्र, स्थानिक तरुणाला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना पोलिसांनी मध्यस्थी करून थांबविले व माफीनाम्यानंतर येथील वादावर पडदा पडला. पोलिसी वर्दीच्या शंकास्पद धोरणामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटील बनत चालला असून, त्याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असल्याचा सूर व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.आईस्क्रीम कट्ट्याची दहशत..गडावरील आईस्क्रीम कट्ट्यावरील तरुणांचे टोळके दारूबंदीचे निमित्त करून पर्यटकांना वेठीस धरते. मुक्कामास राहणारे भाविक, पर्यटक टाईमपास म्हणून पत्ते खेळतात. मात्र, विशिष्ट मंडळीमार्फत पोलिसांना येथे पाचारण करून पत्ते खेळणाºयांवर कारवाई केली जाते; पण लेखी पोलीस कारवाई होताना दिसत नाही. मुळातच येथे अवैध धंद्याकडे डाळेझाक करणे नि त्या व्यवसायात सापडणाºया मंडळींवर कारवाईची बतावणी करून अर्थकारण साधणे, हे नेहमीचेच झाल्याने पर्यटकांची व भाविकांची संख्या घटू लागल्याचे दुखणे व्यावसायिकांनी मांडले. गैरमार्गाने मिळविलेल्या पैशावर विशिष्ट मंडळीचे हात ओले करून भांडवलदार अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असल्याची तक्रार विशाळगडवासीयांतून व्यक्त होत आहे.