कोल्हापूर : प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापारी, विके्रत्यांवर महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून कारवाईचा धडाका लावला आहे. पथकाने सुट्टी दिवशीही कारवाईची मोहिम सुरु ठेवली आहे. शुक्रवारी सकाळी तीन व्यापाऱ्यांवर प्लास्टिकचा वापर केल्यावरुन दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार प्रमाणे १५ हजारांची वसुली केली.महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ३१ मार्चपर्यंत कोल्हापूर शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. प्रबोधन आणि कारवाई असे दुहेरी कार्यवाही सुरु आहे. आरोग्य विभागाकडील ५ पथक शहरातील बाजारपेठेत प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत.
शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त महापालिकेला सुट्टी असतानाही पथकाने कारवाईची मोहिम राबवली. पटेल स्पेअर पार्ट, श्रीस्वामी मोटर्स स्पेअरपार्ट, हॉटेल कोल्हापूर डायनिंग यांच्यावर प्रत्येकी ५ हजार प्रमाणे १५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांच्या मागदर्शनाखाली आरोग्य निरिक्षक श्रीराज होळकर, सुशांत कावडे आदींनी ही कारवाई केली.