कोल्हापूर: आतापर्यंत महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. परंतू आता सीमाप्रश्नाबाबत कर्नाटक सरकारची भाषा मुजोरीची आहे. त्यामुळे या मुजोरीविरोधात सीमावासियांना पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येवून महाराष्ट्र बंद करून दाखवावा असे आवाहन माजी आमदार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले.हजाराहून अधिक सीमावासियांनी सोमवारी रॅलीने कोल्हापुरात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. त्यावेळी किणेकर बोलत होते. यावेळी कोल्हापूरमधील सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवत या आंदोलनाला पाठिंबा दिला. भगवे फेटे बांधून आलेल्या सीमावासियांसह कोल्हापूरच्या नागरिकांनी यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.किणेकर म्हणले, कर्नाटक सरकारने आमचा महामेळावा हाणून पाडला. बेळगावमध्ये ते आम्हांला काहीही करू देणार नाहीत. तरूण पीढीला या लढ्याशी आम्हांला जोडून घ्यायचे होते. महाराष्ट्रात पुन्हा सीमाप्रश्न जागवण्यासाठी कोल्हापुरातून सुरूवात करण्याची गरज असल्याने येथे आलो.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अमित शहा यांच्यादेखत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत ठणकावून सांगितले आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक झाल्यानंतर आम्हांला येथून इशारा द्यावा लागला होता. खासदार संजय मंडलिक म्हणाले, सीमाप्रश्न आता नवीन पीढीने हातात घेतला आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रदेश केंद्रशासित करावा. यावेळी माजी मंत्री भरमूआण्ण्णा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजीव आवळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिंदे गटाचे सुजित चव्हाण यांची भाषणे झाली. आंदोलनाआधी भगवे झेंडे लावलेल्या वाहनांसह सीमावासिय कोल्हापुरात आले. कागल नाक्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथून कोल्हापुरात दसरा चौकात शाहू महाराजांना अभिवादन करून सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या ठिकाणी आंदोलनानंतर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगावचे माजी महापौर मालोजी अष्टेकर, समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सूंठकर, सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेदार यांच्यासह मोठ्या संख्येने सीमाबांधव उपस्थित होते.‘त्यांच्या’ प्रचाराला तेवढे कोण येवू नकामनोहर किणेकर म्हणाले, पूर्वी आमच्या प्रचाराला येणारे आता बेळगावमध्ये आपल्या पक्षाच्या प्रचाराला येत आहेत. अशा नेत्यांच्या कर्नाटकमधील पक्षाने हा भाग महाराष्ट्राला देण्याचे वचन जाहीरनाम्यात द्यावे आम्ही कोणीही निवडणूक लढवत नाही. परंतू बेळगावच्या तीन आणि खानापूरची एक अशा चार जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जिंकणार आहोत.
मुजोर कर्नाटकाविरोधात महाराष्ट्र बंद करून दाखवा, कोल्हापुरातील धरणे आंदोलनात सीमावासियांचे आवाहन
By समीर देशपांडे | Published: December 26, 2022 4:39 PM