कोल्हापूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजाने पुणे-बंगळुरु महामार्गावरील तावडे हॉटेल चौकात सोमवारी बकऱ्यांसह तासभर रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळासाठी वाहतुकीची कोंडी झाली. प्रवर्गात समावेश न केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासह येत्या विधानसभा निवडणुकीत आरक्षण न देणाऱ्या लोकांना योग्य जागा दाखवू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.पंढरपूर येथे सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा पंधरावा दिवस असून, सर्व सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे. मात्र अद्याप सरकारकडून कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याने सोमवारी राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून रास्ता रोको झाला. यावेळी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजामुळेच मी आमदार झालो. सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र गाजत आहे. समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही आमची मागणी आहे. सरकारच्या बाजूने समाज उभा राहिला. मात्र आरक्षण मिळाले नाही. केवळ मतदानासाठी समाजाची गरज असल्याचे दिसते. त्यामुळे अनुसूचित जातीचे परिपत्रक तत्काळ काढावे. समाजातील मुले शिकली तरी त्यांना मेंढरे सांभाळण्याची वेळ येणार नाही. समाजाकडे कोणतेही साखर कारखाने नसल्यानेच आरक्षणाची मागणी आहे. केवळ दोन नेत्यांच्या सूतगिरण्या सोडल्या तर आमच्या समाजाचा चेअरमन दाखवा, असे आव्हानही त्यांनी केले.यावेळी आंदोलनकर्त्यांनी धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. पिवळ्या टोप्या, पिवळे झेंडे घेऊन आंदोलनकर्ते सहभागी झाले. ' एसटी आरक्षण... ' असा आशय टोप्यांवर होता. ' धनगर हित की बात करेगा, वही महाराष्ट्र में राज करेगा', या आशयाच्या फलकांचाही समावेश होता.
धनगर समाजाचा कोल्हापुरात बकऱ्यांसह रास्ता रोको; आंदोलनकर्त्यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:23 PM