कोल्हापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू होणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एक हजार पोलीस कर्मचारी रोटेशननुसार बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. विविध १४ ठिकाणी नाकाबंदी केली जाईल. मास्क नसलेल्या आणि अनावश्यक फिरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक आणि प्रसंगी वाहन जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी दिली.
वीकेंड लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या ९४५ जणांवर, तर अनावश्यक फिरणाऱ्या १९३७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पूर्ण लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद राहतील. त्याबाबत व्यापारी, व्यावसायिकांना सूचना दिल्या जाणार आहेत. लॉकडाऊन काळातील बंदोबस्तासाठी पोलीस दलातील एक हजार कर्मचारी तैनात असणार आहेत. सहाशे होमगार्ड हे पोलीस ठाण्यांना विभागून दिले आहेत. विविध १४ ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरासह तालुका पातळीवर पोलिसांची फिरती पथके असणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, आदी कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
चौकट
८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
जिल्ह्यातील पोलीस दलातील ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ५० वय वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन काम दिले जाणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.
चौकट
नियमांचे पालन करावे
अन्य जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. कोल्हापूरला या परिस्थितीपासून दूर ठेवायचे असेल, तर सर्वांनी लॉकडाऊनबाबतच्या नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले.