विटा : रेणावी (ता. खानापूर) येथील घाटात चार वर्षांपूर्वी झालेल्या शशिकांत ऊर्फ सदाशिव रामचंद्र यादव (वय ३५, रा. माणकापूर, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात विटा पोलिसांना गुरुवारी यश आले. पोलिसांनी यादव यांच्या लहान भावाची पत्नी वर्षा नाईकबा यादव (३१, रा. विजयमालानगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) व हणमंत रामा मगदूम (४२, रा. तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील एक संशयित संतोष शिंदे (रा. संगमनगर, तारदाळ) हा पूर्वीच्या एका गुन्ह्यात इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात असून, अन्य तिघेजण फरार झाले आहेत. शशिकांत ऊर्फ सदाशिव यादव शरीरसुखाची मागणी करीत असल्याने भावजय वर्षा हिनेच हणमंत मगदूम यास २० हजारांची सुपारी देऊन त्याचा खून केल्याची माहिती विट्याचे अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. शशिकांत यादव याचा लहान भाऊ सैन्यदलात आहे. त्याची पत्नी वर्षा एकटीच जयसिंगपूर येथे राहण्यास आहे. तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन शशिकांत तिच्याकडे नेहमी शरीरसुखाची मागणी करीत होता. त्यामुळे वर्षाने त्याचे हात-पाय मोडण्यासाठी हणमंत मगदूम याला २० हजार रुपयांची सुपारी दिली. दि. २ फेब्रुवारी २०११ ला शशिकांत घरातून देवाला जातो, असे सांगून बाहेर पडला. जयसिंगपुरात आल्यानंतर वर्षाने त्याला रेणावी (ता. खानापूर) येथे देवदर्शनाला जाऊ, असे सांगितले. तिला घेऊन तो दुचाकीवरून रेणावीच्या घाटात आला. त्यावेळी घाटात दबा धरून बसलेले हणमंत मगदूम व त्याचे साथीदार संतोष शिंदे, मनोज जगदाळे, किशोर सुकुमार जगदाळे, पंकज वसंत जोशी (सर्व रा. तारदाळ, जि. कोल्हापूर) व वर्षाचा भाऊ संतोष चव्हाण यांनी शशिकांतचा धारदार हत्याराने खून केला. घटनेनंतर सर्व संशयित फरार झाले. दि. ४ फेबु्रवारीला रेणावी घाटात अज्ञाताचा खून झाल्याची माहिती जयराम गुरव यांनी विटा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गोंदणावरून पटली मृतदेहाची ओळख आठ दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांना कर्नाटकातील सदलगा पोलीस ठाण्यातून एक पुरुष बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या व्यक्तीच्या नातेवाइकांना विट्यात बोलावून घेऊन मृतदेहाची छायाचित्रे दाखविली. त्यावेळी उजव्या हाताच्या पोटरीवर हनुमानाचे चित्र व त्याखाली ‘गोपी’ असे गोंदण पाहून नातेवाइकांना मृतदेहाची ओळख पटली. जाधव यांनी शशिकांतचे नातेवाईक व इतर साक्षीदारांकडे कसून चौकशी केली असता त्याची भावजय वर्षाने सुपारी देऊन खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सुपारी घेणारा हणमंत मगदूम याच्यासह अन्य चार संशयितांची नावे निष्पन्न झाली. याप्रकरणी पोलिसांनी वर्षा यादव हिच्यासह हणमंत मगदूमला गुरुवारी अटक केली. या प्रकरणातील संतोष शिंदे पूर्वीच्या गुन्ह्यात इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात आहे.
भावजयीकडून दिराचा सुपारी देऊन खून
By admin | Published: September 11, 2015 12:47 AM