कोल्हापूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यपातळीवरील रक्तदान चळवळीचा एक भाग म्हणून कोल्हापुरातील समस्त मुस्लीम समाजातर्फे आज, गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन या वेळेत येथील दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंगच्या हॉलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ‘लोकमत’ समूहाने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या उपक्रमात समस्त मुस्लीम समाजानेही सहभागी व्हायचे ठरविले आहे. महापूर, कोरोना महामारीसारख्या संकटात मुस्लीम समाजाने मोठ्या हिरिरीने भाग घेऊन समाजाप्रति आपली सामाजिक बांधिलकी जोपासली असून, आता रक्तदानसारख्या राष्ट्रीय कार्यातही पुढाकार घेतला आहे.
मुस्लीम समाजातील सर्व संघटना, संस्था, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जास्तीत जास्त संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी हाेऊन कुर्बानी द्यावी, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे.