आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १२ : सामाजिक बांधीलकी या भावनेतून गेली सोळा वर्षे जोतिबा यात्रेकरूंच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्टतर्फे अन्नछत्राचा उपक्रम राबविला जातो. यंदा या अन्नछत्राचा लाभ दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतला; तर याच परिसरात सीपीआर विभागीय रक्तपेढीतर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४३९ रक्त बाटल्यांचे उच्चांकी संकलनही झाले, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे व ‘सीपीआर’चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथील गायमुख परिसरात ८ ते ११ एप्रिलदरम्यान सुरू करण्यात आलेल्या या अन्नछत्रामध्ये दिवस-रात्र भाविकांकरिता मसालेभात, शिरा, आमटी, कांदा भजी, आंब्याचे लोणचे, भाजी, उपवासासाठी शाबू खिचडी, चहा, थंड मठ्ठा अशी सोय करण्यात आली होती. याकरिता २८ आचारी व त्यांना मदतनीस म्हणून ३५ जण कार्यरत होते, तर ताटवाटी व भांडी धुण्यासाठी ७५ महिलांची स्वतंत्र नेमणूक केली होती.
स्वयंपाकासाठी चार टन लाकूड व १२५ गॅस सिलिंडर लागले. जेवणासाठी दात्यांकडून १२ हजार किलो बासमती तांदूळ, पाच हजार किलो रवा, ७ हजार ५०० किलो साखर, २६० डबे तेल, ४२० किलो तूप, २ हजार किलो तूरडाळ, ७०० किलो मूग, २०० किलो रुचिरा पुलाव मसाला, ३०० किलो शाबूदाणा, २ हजार किलो वांगी, ८०० किलो ढबू मिरची व टॉमेटो, ४०० किलो फ्लॉवर, एक टन इतर भाज्या देण्यात आल्या होत्या. या सर्वांचा वापर यात्राकाळातील चार दिवसांत करण्यात आला. याशिवाय २५० किलो चहा पावडरचा चहा व मठ्ठ्यासाठी सात हजार लिटर दुधाचा वापर करण्यात आला.
बंदोबस्तासाठी आलेले पोलिस, परिवहन विभागाचे अधिकारी, दुचाकी मॅकेनिक असोसिएशन, व्हाईट आर्मी व इतर सेवा संस्थांच्या सदस्यांच्याही जेवणाची सोय करण्यात आली होती. याशिवाय महिलांसाठी स्नानगृह, दहा हजार लिटर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. चार दिवसांत दोन लाखांहून अधिक भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला.यावेळी डॉ. संदीप साळोखे, प्रमोद पाटील, सूर्यकांत गायकवाड, आदी उपस्थित होते.
पोलिसांचा ताण कमी झाला
दरवर्षी अन्नछत्राच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त घ्यावा लागत होता. यंदा मात्र, बिद्री (ता. कागल) येथील स्वराज्य बहूद्देशीय सेवाभावी संस्थेच्या युवक-युवतींच्या माध्यमातून खासगी सुरक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाला.
यंदा सहजसेवा ट्रस्टकडून जोतिबा यात्रेसाठी मागणी झाली. त्यामुळे आम्ही प्रथमच सिंधुदुर्ग येथून वातानुकूलित व्होल्व्हो रक्तसंकलन व्हॅन मागविण्यात आली होती. ती चार बेड व ब्लड स्टोअरेज यंत्र, आदी सोयींनीयुक्त होती. यात्रेकरू उन्हातून दमून आल्यानंतर थंड वातावरणात रक्तदान करणे त्यांना सोपे जावे, याक रिता सोय करण्यात आली होती. यात ४३९ जणांनी दोन दिवसांत रक्तदान केले. अशा प्रकारची व्हॅन कोल्हापुरातही व्हावी, याकरिता मागणी करू.
- डॉ. जयप्रकाश रामानंद,
अधिष्ठाता, सीपीआर रुग्णालय
सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून गेल्या १६ वर्षांपूर्वी सुरूकेलेल्या या उपक्रमास सर्व स्तरांतील दानशूर व्यक्ती व संस्थांनी सहकार्य करून आशीर्वाद दिले. त्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन ही सेवा केली. यासह जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार, पन्हाळा, जोतिबा ग्रामपंचायतींचे सरपंच, जिल्हा पोलिस प्रशासन, वीज वितरण कंपनी, राज्य शासनाचा आरोग्य विभाग यांच्यासह विविध संस्था, कंपन्या, पतसंस्था, साखर कारखाना, अनिल काटे मंडप डेकोरेटर्स, आदींच्या सहकार्याने हा उपक्रम स्थिरावला व वाढला, अशी भावना सहजसेवा ट्रस्टच्या विश्वस्तांची आहे.
- सन्मती मिरजे,
विश्वस्त, सहजसेवा ट्रस्ट