राम मगदूम -- गडहिंग्लज गडहिंग्लज परिसरासह सीमाभागातील जनतेच्या सेवेसाठी येथील लायन्स ब्लड बँकेने अत्याधुनिक उपकरणांसह ‘ब्लड डोनर व्हॅन’ प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी सुमारे ४५ लाख रुपये खर्ची पडले आहेत. या ‘व्हॅन’मुळे खेड्या-पाड्यातदेखील रक्तदान शिबिरे घेणे शक्य झाले असून, ‘रक्तदाना’स गती मिळणार आहे.अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबकडून गडहिंग्लज येथे ब्लड बँक उभारण्यासाठी २५ लाख, रक्त विघटन प्रकल्पासाठी २५ लाख आणि डोनर व्हॅनसाठी ३३ लाख असा एकूण ८३ लाखांचा निधी मिळाला आहे. व्हॅनसाठी १२ लाखांची लोकवर्गणी जमविण्यात आली आहे. १५ वर्षांपूर्वी या परिसरातील आजारी रुग्णांसाठी निपाणी, बेळगाव, व कोल्हापूरहून रक्त आणावे लागत होते. त्यामुळे गडहिंंग्लज विभागाची गरज ओळखून ‘लायन्स’चे ज्येष्ठ सदस्य इंजि. आण्णासाहेब गळतगे यांनी ‘लायन्स क्लब’च्या सहकार्याने २००१ मध्ये गडहिंग्लजमध्ये लायन्स ब्लड बँकेची स्थापना केली. त्यासाठी आतापर्यंत सुमारे एक कोटी खर्ची पडले आहेत.‘गडहिंग्लज’च्या ब्लड बँकेमुळे गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, कागल, भुदरगडसह, चिक्कोडी, हुक्केरी, गोकाक, बैलहोंगल या तालुक्यांतील जनतेचीही मोठी सोय झाली. रक्ताची वाढती गरज भागविण्यासाठी या परिसरात रक्तदान शिबिरेही भरवली जातात. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो.२००४ मध्ये ब्लड बँकेत ‘रक्त विघटन प्रकल्प’ सुरू केल्यामुळे रुग्णांना हवा तो रक्तघटक वेळेवर उपलब्ध करणे शक्य झाले आहे. धावपळीच्या युगातील विविध प्रकारच्या आजारांमुळे आणि वाढत्या अपघातांमुळे रक्ताची मागणी वाढली आहे. रक्तदानासाठी आवश्यक सोयी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील रक्तदान शिबिरांवर मर्यादा येत होत्या. मात्र, या व्हॅनमुळे ही अडचण दूर झाली आहे.नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या डॉक्टर कॉलनीतील मध्यवर्ती जागेवर ब्लड बँकेसाठी सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. उभारणीसाठी केलेली आर्थिक मदत आणि दिलेल्या योगदानामुळे ब्लड बँकेला गळतगे यांचेच नाव देण्यात आले आहे.७६ हजार पिशव्या रक्तपुरवठादरवर्षी ‘गडहिंग्लज’च्या ब्लड बँकेकडे ४५००-५००० रक्त पिशव्यांची मागणी होते. १५ वर्षांत आतापर्यंत ७६ हजार रक्त पिशव्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.११ रुग्णांना दरमहा मोफत रक्त‘थॅलोसिया’ व ‘हिमोफिलिया’ या आजाराने त्रस्त असलेल्या ११ रुग्णांना दरमहा प्रत्येकी एक पिशवी रक्त मोफत दिले जाते.रक्ताची गरज कधी भासते ?अपघातातील अत्यवस्थ रुग्ण, बाळंतपण, मोठ्या शस्त्रक्रिया आणि अॅनिमिया आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज भासते.वातानुकूलित व्हॅनमधील सुविधाआरामदायी व्हॅनमध्ये रक्तदात्यांसाठी ४ बेडस्, पंखे, रक्तसंकलन फ्रिज, कोच, आदी सुविधा आहेत. गाडीतील छोट्या पडद्यावर रक्तदानाविषयी माहितीपट दाखविला जाणार आहे.रक्तदान शिबिरे प्रामुख्याने शाळा-महाविद्यालयात होतात. त्यामुळे परीक्षा व प्रवेशाच्या कालावधीत मे ते जुलैअखेर रक्ताचा तुटवडा भासतो. याकाळात गावोगावी व्हॅन फिरवून रक्तदान शिबिरे घेणे शक्य झाले आहे.
गडहिंग्लजकरांच्या सेवेत ‘ब्लड डोनर व्हॅन’
By admin | Published: July 29, 2016 12:03 AM