कोल्हापूर : रुग्णांना सुरक्षित रक्तपुरवठा करण्यासाठी नॅट (न्यूक्लेईक ॲसिड टेस्टिंग) ही जागतिक स्तरावर अद्ययावत असणारी टेस्टिंग प्रणाली कोल्हापुरातील रोटरी समाजसेवा केंद्राच्या राजर्षी शाहू रक्तपेढीमध्ये सुरू आहे. या प्रणालीमध्ये रक्त तपासणीतून रक्ताची गुणवत्ता अवघ्या चार दिवसांत समजणार आहे. यापूर्वी हा कालावधी ४५ दिवसांचा होता. रोटरीच्या नव्याने सुरू झालेल्या हायड्रोथेरपीचा तर हजारो रुग्ण लाभ घेत आहेत.
कोल्हापुरात नागाळा पार्कातील राजर्षी शाहू रक्तपेढी इतर पेढ्यांशी स्पर्धा न करता या रक्तपेढीतून माफक, सवलतीत गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार रक्तपुरवठा करते. रुग्णांना सुरक्षित रक्तपुरवठा करण्यासाठी विजनेरियो लाईफ सायन्समार्फत या रक्तपेढीत जागतिक स्तरावर नॅट ही अत्याधुनिक प्रणाली ऑक्टोबर महिन्यापासून कार्यरत आहे. यात रक्ततपासणीचा विंडो पिरियड चार दिवसांपर्यंत कमी होतो. यामुळे रक्तघटकांची गुणवत्ता वाढून अधिक सुरक्षित रक्त रुग्णांना मिळते.
इतर केंद्रांचा सेवा विभागहायड्रोथेरपी : गरम पाण्याच्या माध्यमातून जलद आणि तत्काळ उपचार मिळण्यासाठी हे अत्याधुनिक तंत्र कोल्हापुरातही उपलब्ध झाले आहे. सध्या ही सेवा दर शुक्रवारी संपूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली आहे.
फिजिओथेरपी : फिजिओथेरपी सेंटरमध्ये रोज सरासरी ८० ते १०० रुग्णांवर उपचार होतात. अद्ययावत उपकरणे, फिजिओथेरपिस्ट, नवीन तंत्रज्ञान याद्वारे ३५ प्रकारच्या उपचारपद्धती येथे उपलब्ध आहेत.
पर्किन्सन्स डिसिज रिहॅबिलिटेशन सेंटर : सध्या या प्रकारचे रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी आठवड्यातून एकदा ही उपचारपद्धती विनामूल्य उपलब्ध करण्यात आली आहे.
स्पीच थेरपी : येथील वाचा आणि श्रवण केंद्रात अद्ययावत उपकरणे असून बेरा टेस्ट, स्पेशल टेस्ट, ईएनजी टस्त, व्हीएनजी टेस्ट करतात. यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञ उपलब्ध आहे. सहा वर्षांआतील मुलांसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांकडून स्पीच थेरपी उपलब्ध आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या रक्तपेढीत रक्ताची गुणवत्ता तपासणारी अद्ययावत यंत्रणा आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि ईक्यूएएस या आंतरराष्ट्रीय दर्जा तपासणी संस्थेकडून गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.व्ही. बी. पाटील,अध्यक्ष, राजर्षी शाहू रक्तपेढी.