लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एकीकडे रुग्णांना रक्त मिळत नाही म्हणून राज्य शासन रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन करते; मात्र गोरगरिबांचा आधारवड असलेल्या सीपीआरच्या कोंडाळ्यातच चक्क रक्तपिशवी सापडली आहे. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी संकलित केलेली रक्तपिशवी क्र १३३१, रक्तगट ए पॉझिटिव्ह ही रक्त पिशवी कोंडाळ्यात टाकल्याचे निदर्शनास आले आहे. ती वापरण्याचा कालावधी २२ मार्च २०२१ आखेर असल्याचे रक्त पिशवीवर नमूद आहे.
रक्तदानाची चळवळ सर्वत्र नि:स्वार्थीपणे राबवली जाते. कोल्हापुरात तर रक्तदान चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली जाते. ज्या ज्यावेळी रक्ताची टंचाई भासू लागते, त्यावेळी सामाजिक संस्था, तरुण मंडळे रक्तदानासाठी पुढे सरसावतात. त्यामुळे कोल्हापुरातील सर्वच रक्तपेढ्या नेहमीच फुल्ल असतात. रक्तदान हे पवित्र दान असल्याची भावना सामान्य माणसाची असल्याने येथे भरभरून प्रतिसाद मिळतो. मात्र सामान्य माणसाच्या भावनेचा बाजार मांडल्याचे आपणास पाहावयास मिळते. ही रक्त पिशवी जर रुग्णासाठी वितरित झाली असेल, तर ती रुग्णाला का लावली गेली नाही? ती रक्तपिशवी कोणत्या डॉक्टरांनी कोणत्या रुग्णांसाठी मागवली? मागवून जर ती रुग्णाला लावली जात नसेल, तर गरज नसताना का मागवली? अशाप्रकारे गरज नसताना मागणी करून रक्त पिशव्यांचा चुकीच्या कारणासाठी वापर होतोय का? रक्त मागणी केलेल्या रुग्णांच्या केसपेपरवर या पिशवीची नोंद होते का? निदर्शनास आलेल्या गलथानपणामुळे रुग्णाला त्याच्याच नावे मागवलेली रक्तपिशवी लावली जाते का? रक्ताचा काळाबाजार सुरू आहे का? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत.
मध्यंतरी शासकीय रुग्णालयातील सर्वच रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा संशय बळावत आहे. कोंडाळ्यात रक्तपिशवी सापडली. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी हे रक्तसंकलन केलेले आहे. बोगस रुग्णाच्या नावावर रक्तपेढीत पिशवी आणली कोणी? त्यातून रक्ताचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय बळावत आहे. ही सापडलेली एक रक्तपिशवी आहे. अशाप्रकारे रक्तपिशव्यांचा गैरकामासाठी वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब अतिशय गंभीर असून, महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध विभागाकडून रक्तपेढीची व आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची चौकशी होणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
(फोटो-२४०२२०२१-कोल-ब्लड)