कोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्याप्रमाणेच रक्ताच्या मागणीवरही परिणाम झालेला आहे. सुरुवातीच्या काळात स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक रक्तदात्यांनी मागणी नसतानाही ज्या पध्दतीने रक्ताची गरज भागवली, त्यातुलनेत रक्ताची खरी गरज असताना आता रक्ताची मागणी वाढली आहे.लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर उद्योगधंदे, वाहतूकीमुळे दैनंदिन रहाटगाडगे पुन्हा सुरु झाले आहे. कोरोना विषाणूचा रुग्ण प्रमाण वाढत असले तरी जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नियोजित हदयरोग, कॅन्सर यासारख्या मोठ्या शस्त्रक्रियाही होउ लागल्या आहेत. यासाठी तसेच अपघाताचे प्रमाणही वाढत असल्याने जखमी रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे.थॅलेसेमिया, हिमोफिलिया, अॅनिमिया, गुंतागुंतीच्या प्रसूती या रुग्णांसोबतच पावसाळ्यामुळे उद्भवलेल्या डेंग्यू, चिकुनगुणियासारख्या साथीमुळे रक्त आणि रक्तघटकांची मागणी वाढलेली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात एफुण १२ रक्तकेंद्रे असून महिन्याला साधारण सात हजारापर्र्यत तर दिवसाला २00 ते २५0 रक्तपिशव्यांची मागणी आहे. सध्यस्थितीत हा साठा अवघा ८00 पिशव्यांइतका कमी झाला असून त्यामानाने रक्ताची मागणी वाढलेली आहे.रक्त हे ४२ दिवसच टिकून राहते आणि रक्ताच्या प्लेटलेटससारख्या घटकाचे आयुष्यही केवळ पाच दिवसाचेच असते. त्यामुळे यापूर्वी हिरिरीने रक्तदान शिबिरे आयोजित करुन मिळविलेल्या रक्ताचा साठा आता जवळजवळ संपला आहे.
गेल्या तीन महिन्यात लॉकडाउनमुळे उपचाराअभावी रक्ताची मागणी अत्यंत कमी झाली होती आणि रक्तसाठा मात्र अतिरिक्त होता. याउलट आता मागणीच्या मानाने हा साठा अपुरा पडत आहे.महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान शिबिर घेणे शक्य होत नाही, याशिवाय मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केल्याने किंवा इतर कारणांनी अशी शिबिरे जवळजवळ बंद झाली आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या पुढाकाराने घेण्यात येणारी शिबिरेही बंद झाल्याने मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.हे पाळावे लागणार...सुरक्षित सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा योग्य वापर, एकाच वेळी पाचपेक्षा रक्तदाने न बोलावणे, रक्त देणाऱ्या व्यक्तीच्या प्रवासाची तसेच आरोग्याची माहिती घेउन रक्तदान शिबिर घेण्याची गरज आहे.रक्तदात्यांनी या संकेतस्थळावर करावी आॅनलाईन नोंदणीइच्छूक रक्तदात्यांनी 0२३१्-२६४४३३७, व्यक्तिगत रक्तदान करण्यासाठी www.kolhapurcollector.com या संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने नोंदणी करायवी आहे. गरजेप्रमाणे जिल्हा प्रशासन आणि रक्तपेढी यांच्या समन्वयाने अशा रक्तदात्यांना संपर्क साधण्यात येणार आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषद आणि आरोग्य मंत्रालयांनी आखून दिलेल्या नियमांनुसार रक्तदान शिबिरे पुन्हा घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपण केलेले रक्तदान अनेकांचे जीव वाचवू शकते.- दीपा शिपुरकर,रक्त संकलन समन्वय अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती, कोल्हापूर.