एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हत्या केल्यानंतर तिचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते. गेल्या चार वर्षांत सात खुनांचे गूढ कायम आहे. त्यांपैकी चार खुनांची पोलिसांना ओळखही पटविता आलेली नाही. या गूढ हत्यांचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक बनला आहे. कट रचून आणि डोके लढवून खूनसत्र हे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने फारच चिंताजनक आहे.वाशी (ता. करवीर) येथील ‘सुतारकी’ नावाच्या उसाच्या शेतात अज्ञात पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचे आढळून आले होते. मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने ही बालिका कोण? तिचा खून कोणी केला? याचा उलगडा करवीर पोलिसांना झालेला नाही. वाघबीळ घाटातील झुडपात छिन्नविच्छिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला. त्याचे शीर गायब होते. किडे-मुंग्या लागून धड कुजले होते. शवविच्छेदन करण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे करवीर पोलिसांनी त्या जागेवरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. परंतु हा तरुण कोण? त्याचा खून कोणी केला? हे प्रश्न आजही तसेच आहेत. शिवाजी पेठेतील हृषिकेश अनिल कोगेकर या तरुणाचा कसबा वाळवे गावानजीक उसाच्या शेतामध्ये निर्घृण खून केला होता. त्याची ओळख पटूनही मारेकºयांचा शोध लागलेला नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जुना राजवाडा व राधानगरीच्या पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करूनही अद्याप धागेदोरे हाती लागलेले नाहीत.रुकडी (ता. हातकणंगले) येथील डॉ. प्रज्ञा व उद्धव दत्तात्रय कुलकर्णी या दाम्पत्याच्या खुनाचे गूढ कायम आहे. शिवाजी पेठ येथील निवृत्ती चौक परिसरातील वृद्ध फिरस्ता नारायण रावबा देसाई (वय ७२, रा. मूळ गाव खोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचाही गोळी घालून खून झाला. गिरोली घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह मिळून आला. मोरेवाडी येथेही तरुणाचा खून झाला. करवीर, जुना राजवाडा, राधानगरी, कोडोली पोलीस ठाणे हद्दीतील खुनांचा उलगडा झालेला नाही. मारेकºयांनी थंड डोक्याने आणि पुरावे पाठीमागे न सोडता खून केला असल्याचे पोलिसांचे मत आहे. गुंतागुंतीचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात हातखंडा असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही हतबल झाले आहे.खुनाचे कारणविवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य, जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत सर्वाधिक हत्या या अनैतिक आणि पूर्ववैमनस्यातून घडल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे.पोलीस अपयशी : जिल्ह्यात पोलिसांचा धाक कमी झाल्याने गुन्हेगारी वाढू लागल्याची चर्चा नागरिकांत आहे. लूटमार, खासगी सावकारकी, मटका, जुगार, दारूयांसारखे अवैध व्यवसाय जोमाने फोफावत असल्यामुळे गुन्हेगारीचा आलेख चढता असल्याची वस्तुस्थिती आहे. या सर्व घटनांना आवर घालण्यात पोलीस मात्र अपयशी ठरले आहेत.
डोके लढवून खूनसत्र; सात खुनांचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:21 AM