आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ३१ : अंबाबाई मूर्ती संवर्धनाच्या प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या पदार्थांमुळे मूर्तीवर पांढरे डाग पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आर्द्रता समितीने बुधवारी व्यक्त केला. मूर्तीवरील चकाकीचा थर कमी झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी प्श्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख पी.डी. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आर्द्रता समिती नियुक्त केली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता राऊत यांच्यासह उदय गायकवाड, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद कारंजकर, माधव मुनिश्वर, केदार मुनिश्वर यांनी अंबाबाई मूर्तीची पाहणी केली.
या पाहणी दरम्यान मूर्तीवर पांढऱ्या डागाचा थर नव्याने पडत आहे की तो संवर्धनाचाच एक भाग आहे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. मूर्ती ओली केली जाते तेंव्हा हे डाग दिसत नाही मात्र मूर्ती कोरडी होईल तसे डाग दिसू लागतात. त्यामुळे हे डाग म्हणजे संवर्धनातील पदार्थांचाच एक भाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती उदय गायकवाड यांनी दिली.
प्रक्रियेची सीडी उघड करा : आर्द्रता समितीची मागणी
तत्कालिन अधिकारी मनेजर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या संवर्धन प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग करण्यात आले आहे. ही सिडी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली त्यांनी ती सचिवांच्या ताब्यात दिली. या संवर्धनातील घटकांचा मूर्तीवर परिणाम होत असल्याने ती सिडी आर्द्रता समितीसमोर तरी उघड करा, सीडीचा गैरवापर होवू नये यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या उपस्थिीतीत ती दाखवण्यात यावी अशी मागणी या समितीतील सदस्यांनी केली आहे.
पूरातत्वकडून शुक्रवारी पाहणी
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी औरंगाबाद येथील पूरातत्वच्या अधिकाऱ्यांश्ी संपर्क साधून अंबाबाईची मूर्ती पाहणीसाठी कोल्हापूरात येण्याची विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२ जून) पूरातत्व खात्याचे अधिकारी अंबाबाई मूर्तीची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच नक्की चुकलंय कुठे हे स्पष्ट होईल.
अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन का?
पूरातत्वच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाईच्या केवळ अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन केलेल्याचे आर्द्रता समितीच्या निदर्शनास आले आहे. देवीचा चेहरा, उजवी व डावी बाजू मुकूट येथे पांढरे डाग नाही. कारण या भागावर संवर्धनाचे काम करण्यात आलेले नाही. देवीची गदा, पाय, सिंह आणि त्यावरील बाजू, ढाल या संवर्धन केलेल्या ठिकाणी हे डाग पडले आहेत. आणि चकाकीचा थर कमी झाला आहे. अशा पद्धतीने काम का करण्यात आले हा प्रश्न आहे.
पूरातत्वच्या अधिकाऱ्यांनी मूर्ती संवर्धनात कोणते साहित्य किती प्रमाणात वापरले, संवर्धन नेमके कसे केले याची आम्हाला काहीच माहिती नाही. पूरातत्वचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुनच याबाबतचे भाष्य करता येईल.
पी.डी. राऊत,
अध्यक्ष, आर्द्रता समिती