लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या तीन ज्येष्ठ संचालकांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले आहे. याबाबतचा अहवाल सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी सोमवारी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
शेतकरी संघाचे तीन संचालक अपात्र, पाच जणांचे निधन आणि तिघांचे राजीनामे झाल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले आहे. संघाच्या संचालक मंडळातील १९ पैकी ११ जागा रिक्त झाल्याने संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करावी, अशी मागणी संघाचे माजी संचालक अजितसिंह मोहिते व सुरेश देसाई यांनी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली होती. जिल्हा उपनिबंधकांकडे आलेले तीन संचालकांचे राजीनामे आणि मोहिते, देसाई यांनी केलेली मागणीनुसार संचालक मंडळ रचनेबाबत सध्यस्थितीची चौकशी करण्यासाठी प्रदीप मालगावे यांची नेमणूक केली होती. मालगावे यांनी सोमवारी संघात जाऊन प्रोसेडिंगची तपासणी करून अहवाल सादर केला आहे. तीन अपात्र, पाच मयत संचालक झाले आहेत. तीन संचालकांनी राजीनामे दिल्याचे समजते. मात्र ते अद्याप आमच्याकडे आलेले नाहीत. त्यामुळे संघाचा कारभार उत्तम सुरू असल्याचे संघाचे प्रभारी व्यवस्थापक सचिन सरनोबत यांनी सहकार विभागाला सांगितले आहे. असे जरी असले तरी संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
कारवाई टाळण्यासाठी धडपड
संघावर प्रशासक येणार हे अटळ आहे. मात्र ही कारवाई थांबवण्यासाठी उर्वरित संचालकांपैकी दोघांनी धडपड सुरू केली आहे. नेत्यांकडे जाऊन कारवाई टाळण्याची विनंतीही केली आहे, मात्र एकूण परिस्थिती पाहता, प्रशासकाची कारवाई अटळ आहे.