आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ : अक्कासाहेब महाराजांनी स्थापन केलेल्या शालिनी सिनेटोन स्टुडिओची राखीव जागा बिल्डर लॉबीकडून हडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने आंदोलनाचे पाऊल उचलले असून मंगळवारी या जागेच्या मालकी हक्कासंबंधीचे फलक महामंडळाच्यावतीने लावण्यात आले. त्यानंतर महापौर हसिना फरास यांना निवेदन देण्यात आले.
शालिनी सिनेटोन परिसराच्या ४७ एकर जागेपैकी, ५ व ६ क्रमांकाचे जवळपास साडे सात एकर भूखंड शालिनी सिनेटोनसाठी राखीव आहे. तसेच तुकोजीराव कृष्णरावजी पवार महाराज आॅफ देवास यांनीही जागा शालिनी सिनेटोनसाठी राखीव ठेवली आहे. त्याची कागदपत्रे महामंडळाकडे आहेत. मात्र, न्यायालयीन वाद आणि निकालाचा दाखला हे बिल्डरांकडून ही जागा हडप करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती चित्रपट महामंडळाला मिळाली. या जागेचा वापर चित्रीकरणासाठीच व्हावा, यासाठी आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कलाकार संघटना व विविध संस्था, संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून मंगळवारी स्टुडिओ परिसरात फलक उभारण्यात आला . आज बुधवारी दुपारी चार वाजता महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याशी या विषयावर चर्चा केली जाणार आहे.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी शालिनी सिनेटोनच्या आठवणींना उजाळा दिला. माजी अध्यक्ष यशवंत भालकर म्हणाले, जयप्रभा स्टुडिओ बंद पडला. शालिनी सिनेटोनही जमीनदोस्त झाला आहे. मात्र या ठिकाणी बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम पासून अनेक निर्माते दिग्दर्शकांनी गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
येथे स्टुडिओ होता असे सांगण्यासाठी का असेना ही जागा राखीव राहिली पाहीजे. यावेळी उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह रणजीत जाधव, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, विजय शिंदे, अशोक माने, अवधूत जोशी, सतीश बिडकर, शरद चव्हाण, आकाराम पाटील, शुभांगी साळोखे, अशोक जाधव, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, अरूण चोपदार, संतोष शिंदे, सागर बगाडे, संग्राम भालकर, महामंडळाचे व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर आदी उपस्थित होते.