गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी २१ सदस्यांची यादी मंजुरीसाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठवली आहे.ऑगस्ट २०२० मध्ये तत्कालीन संचालक मंडळाची मुदत संपली. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक म्हणून येथील सहाय्यक निबंधकाची नेमणूक झाली. दरम्यान, विद्यमान संचालकांनाच मुदतवाढ मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. परंतु, त्यांच्या आशेवर पाणी फिरल्याचे स्पष्ट झाले.गडहिंग्लज, आजरा,चंदगड व कागल असे बाजार समितीचे साडेतीन तालुके कार्यक्षेत्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीवर सर्वपक्षीय आघाडी सत्तेवर आहे. परंतु,आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना आणि मित्रपक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचीच वर्णी अशासकीय प्रशासक मंडळात लावण्यात आली आहे.
कुणाची लागणार वर्णी?
अशासकीय प्रशासक मंडळात अभय देसाई, मुकुंद देसाई, जयकुमार मुन्नोळी, भीमराव राजाराम, जानबा चौगुले, धनाजी तोरस्कर, सोमगोंडा आरबोळे, रोहित मांडेकर, राजशेखर यरटी, विक्रम सुरेश चव्हाण - पाटील, संजय उत्तुरकर, दिग्विजय कुराडे, सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, प्रभाकर खांडेकर, संभाजी भोकरे, दिलीप माने, लगमाना कांबळे, संपत देसाई, राजेंद्र गड्यानावर, विजय वांगणेकर यांचा समावेश आहे. यांनाही संधी मिळणार !राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय जोशी व माजी सभापती अमर चव्हाण यांना जिल्हा नियोजन मंडळावर तर शिवप्रसाद तेली यांना खनिजकर्म महामंडळाच्या सदस्यपदी संधी दिली जाणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.भाजपाला रोखण्याची खेळी !गेल्या निवडणुकीत सत्ताधारी सर्वपक्षीय आघाडीत पारंपरिक गट म्हणून सहभागी असणारे माजी मंत्री भरमू पाटील, गोपाळराव पाटील,प्रकाश चव्हाण व अशोक चराटी हे दरम्यानच्या काळात भाजपावाशी झाले आहेत.त्यामुळेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपाला रोखण्यासाठीच ही खेळी केल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.