सांगली : सांगलीत विरंगुळ्याचे ठिकाण कोणते, असा प्रश्न कोणी विचारला, तर उत्तर नकारार्थीच येते. आमराई व महावीर उद्यान सोडले, तर परगावच्या नातेवाईकांना सांगली शहरात कोठे फिरायला न्यायचे, असा प्रश्न सांगलीकरांना पडतो, पण आता लवकरच कृष्णा नदीकाठच्या माई घाटावर बोटिंग क्लब सुरू होत आहे. पर्यटकांच्यादृष्टीने हे आकर्षणाचे केंद्र येत्या दोन महिन्यात सांगलीकरांसाठी सुरू होणार आहे. संथ वाहणारी कृष्णा नदी सांगलीकरांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. कृष्णाकाठ पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू झाला आहे. पाटबंधारे विभाग, महापालिका यांच्या सहकार्यातून आतापर्यंत कृष्णाकाठाचा कायापालट होत आहे. पाटबंधारे विभागाने पूरसंरक्षक भिंत उभारली असून त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. राज्य शासनाने नदीकाठावर वसंतदादा पाटील, विष्णुअण्णा पाटील यांच्या समाधीस्थळाचे सुशोभिकरण केले आहे. त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम महापालिकेकडे सोपविले आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेने ऐतिहासिक आयर्विन पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. समाधीस्थळ, माई घाटाच्या परिसरातही एलईडी दिवे बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हा सारा परिसर विद्युत रोषणाईने उजळणार आहे. त्यात आता पर्यटनाच्यादृष्टीने जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग व महापालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्धार केला आहे वसंतदादा स्मारक स्थळानजीक असणाऱ्या नदीकाठावर बोटिंग क्लब उभारण्यात येणार आहे. पाटबंधारे व गृह खात्यानेही त्याला मान्यता दिली आहे. सध्या स्मारक परिसरात असणाऱ्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे. तेथे नावाडी प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. पूर आल्यावर संबंधित गावातील नागरिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यासाठी नावाड्यांची गरज लागते. परंतु कित्येक नावाड्यांना त्याचे प्रशिक्षण नसल्याने काही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे तालुक्यातील नावाड्यांना येथे प्रशिक्षण देण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने मसाई वॉटर स्पोर्टस् अॅडव्हेंचर अॅकॅडमी या संस्थेला बोटिंग क्लब सुरू करण्याची मान्यता दिली आहे. लवकरच कृष्णा नदीत स्पीड बोट, मोटर बोट, बनाना बोट, सायकल बोट नागरिकांच्या सेवेत दाखल होतील. त्यामुळे सांगलीकरांसाठी विरंगुळ्याचे, पर्यटनाचे स्थळ निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)कृष्णा नदीत बोटिंग क्लब सुरू करण्यास पाटंबधारे व गृह विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सांगलीत आणखी एक पर्यटन स्थळ विकसित होण्यास मदत होईल. महापालिकेकडून सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. जिल्हा प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. - डॉ. प्रशांत रसाळ, उपायुक्त महापालिकाकृष्णा महोत्सवनूतन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सोमवारी बोटिंग क्लबच्या प्रात्यक्षिकावेळी हजेरी लावली. त्यानंतर कृष्णा नदीकाठी बोटिंग क्लबसह अनेकविध प्रकल्प उभारण्याचा मानस केला आहे. कृष्णा महोत्सव, लेझर शो, अॅम्फी थिएटरही उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.
कृष्णा नदीत आता बोटिंग क्लबची धमाल
By admin | Published: May 26, 2015 11:06 PM