इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह शुक्रवारी सापडले. महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने पट्टीचे पोहणारे अनिल पाटोळे यांना सोबत घेऊन तब्बल बारा तास शोधमोहीम राबवून मृतदेह शोधून काढले. त्यातील एका मुलाचे नाव तन्मय तुषार सपकाळ (वय १५, रा. मुंबई) असे आहे, तर घटनेला ३५ तास उलटले तरी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या मुलाची ओळख पटली नाही. त्याच्या नातेवाइकांचा शिवाजीनगर पोलिस शोध घेत आहेत.मुंबईचा तन्मय हा सुटीसाठी इचलकरंजीतील मामाकडे आला होता. गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास तो मित्रांसोबत पंचगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह गतिमान होता. तेथे एक बारावर्षीय मुलगा नदीपात्रात बुडत असल्याचे पाहून तन्मय हा त्याला वाचविण्यासाठी तेथे गेला; परंतु दोघेही प्रवाहाबरोबर वाहून गेले. दोघांना बुडताना पाहून अन्य मित्रांनी आरडाओरड केली. त्यानंतर महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे, शिवाजीनगरचे तेजस कांबळे यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत यांत्रिक बोट घेऊन शोधमोहीम राबवली; परंतु दोघेही आढळले नाहीत. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबवून शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू केली. संजय कांबळे यांच्यासह पथकातील सुखदेव जावळे, आकाश आवळे, शाखानंद कांबळे, शीतल ज्योती, अजय कांबळे व पट्टीचे पोहणारे पाटोळे यांनी शुक्रवारी दिवसभर तब्बल बारा तास पंचगंगा नदीत शोध घेतला. सकाळी पहिल्या टप्प्यात बारावर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तन्मयचा मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला.दरम्यान, दुसऱ्या बारावर्षीय मुलाचा मृतदेह सकाळी सापडल्यानंतर त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम शिवाजीनगर पोलिसांनी सुरू केले. फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला, तसेच परिसरातील सर्व पोलिस ठाण्यांतही मुलगा हरवल्याची तक्रार नोंद झाली आहे का, याची तपासणी केली; परंतु ३५ तास उलटले तरी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मुलाच्या नातेवाइकांचा शोध लागला नाही. त्याचा मृतदेह आयजीएम रुग्णालयात शवपेटीत ठेवण्यात आला आहे.
पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह सापडले, इचलकरंजीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 12:39 PM