चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : खेळाडूंचे शरीर आणि मन तंदुरुस्त आणि मजबूत करण्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र ‘द ब्रीज’ येत्या सोमवारपासून कोल्हापुरात सुरू होत आहे. येथील सावली केअर सेंटरने उभारलेले हे अशा प्रकारचे देशातील पहिलेच केंद्र आहे.
कोणत्याही स्पर्धेत यश मिळविण्यासाठी केवळ क्रीडा कौशल्य असून चालत नाही, तर त्यासाठी शरीर आणि मनदेखील मजबूत असावे लागते. आपल्याकडे नेमकी त्याचीच उणीव जाणवते. ती भरून काढण्यासाठी, तसेच सर्व प्रकारचे प्रशिक्षण एकाच छताखाली दिले जावे यासाठी हे केंद्र सुरू केल्याची माहिती सावली केअर सेंटरचे संचालक किशोर देशपांडे यांनी दिली.
आपल्याकडे गुणवत्ता कमी नाही, क्रीडाकौशल्यही कमी नाही; पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा मानसिक कणखरपणा यामध्ये आपले खेळाडू कमी पडतात. याची कारणे शोधताना भारतात क्रीडा अकादमी भरपूर आहेत; मात्र तेथे फक्त त्या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. बहुतांशी खेळाडूंना एकच प्रशिक्षक असतो तोही पूर्वाश्रमीचा खेळाडू असतो. फिजिओंना गरजेप्रमाणे बोलावून घेतले जाते असे आढळून आले. अनेक खेळाडू अत्याधुनिक प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात; मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न खेळाडूंनाच हे शक्य होते. गुणवत्ता आहे, पण आर्थिक परिस्थिती नाही म्हणून अनेक खेळाडूंची गुणवत्ता मारली जाते. असे होऊ नये यासाठी आंतरराष्टÑीय दर्जाचे प्रशिक्षण आपल्या इथेच एकाच छताखाली का देऊ नये या विचाराने द ब्रीज- अ स्टेप्स टुवर्डस स्पोर्टस् एक्सलन्स या प्रकल्पांतर्गत हे केंद्र सुरू करण्यात येत आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.
कोणत्याही खेळाडूला संबंधित क्रीडा प्रकार, शारीरिक, मानसिक, वैद्यकीय आणि आहार या पाच प्रकारचे प्रशिक्षण गरजेचे असते. या केंद्रात संबंधित खेळाचा प्रशिक्षक नसेल मात्र तज्ज्ञ सायकॉलिजिस्ट, फिजिओथेरेपिस्ट, फिजिशियन आणि न्युट्रीशियन असे चार तज्ज्ञ प्रशिक्षक डॉक्टर त्या खेळाडूची गरज ओळखून त्याला हवे तसे घडवतील. मान्यताप्राप्त ५२ खेळ मान्यताप्राप्त ५२ क्रीडा प्रकार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकाराची गरज वेगवेगळी असते. ही गरज ओळखून खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना तो ज्या प्रकारात खेळतो त्याचे प्रशिक्षण दिले जाणार नाही. मात्र, त्याच्या सरावाची सोय करून दिली जाणार आहे.
- प्रवेशासाठीची अट
या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रात निकष पूर्ण करणाºया आणि किमान जिल्हास्तरावर खेळलेल्या खेळाडूंनाच प्रवेश दिला जाणार आहे.
- हवामानानुकूल प्रशिक्षण
बऱ्याचवेळा आपल्या खेळाडूंना युरोप, अमेरिकेतील थंड हवामानात आपली कार्यक्षमता टिकविणे कठीण जाते. यामुळे यशाचे प्रमाण कमी होते. यावर मात करण्यासाठी भविष्यात कोणत्याही हवामानात कशी कार्यक्षमता उंचावता येईल याचे प्रशिक्षण देणारी व्यवस्था करण्याचेही नियोजन आहे.
भारतातील गुणवत्तापूर्ण खेळाडूंचे शरीर आणि मन घडविण्याचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाणार आहे. येथे प्रशिक्षण घेतलेले खेळाडू येत्या जुलै, आॅगस्टमध्ये जपानमध्ये होणा-या आॅलिम्पिक स्पर्धेत नाही; मात्र २०२४ च्या आॅलिम्पिक स्पर्धेत निश्चितपणे दिसतील आणि यश मिळवतील असा मला ठाम विश्वास आहे.- किशोर देशपांडे, संचालक