सचिन भोसलेकोल्हापूर : परिवहन आयुक्त विभागाने राज्यातील ५० प्रादेशिक कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकाना अंगावर घातलेले कॅमेरे (बॉडी- वॉर्न कॅम) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अशा ६२ अधिकाऱ्यांना हे कॅमेरे लवकरच मिळणार आहेत.प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहा वायू पथकाद्वारे अचानक तपासणी मोहीम आणि वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी केली जाते. अशावेळी काही वाहनधारक किंवा टोळ्या मोटार वाहन निरीक्षक किंवा सहाय्यक मोटार निरीक्षक अशा तपासणी अधिकाऱ्यांवर हल्ला, शाब्दिक चकमक, अपमानास्पद वागणूक, अरेरावी ,दमदाटी, हुज्जत घालून गोंधळ करत असेल तर अशा अंगावर परिधान केलेल्या (बॉडी- वॉर्न कॅम) द्वारे चित्रीकरण होते आणि हा पुरावा म्हणून उपयोगी येतो. असे कॅमेरे राज्यातील एक हजाराहून अधिक मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार आणि निरीक्षकांना दिले जाणार आहेत.
त्यात कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत सांगली, इचलकरंजी अशा तीन कार्यालयात अंतर्गत चाळीस सहाय्यक मोटार निरीक्षक आणि २२ मोटार वाहन निरीक्षक असे ६२ अधिकाऱ्यांना हे कॅमेरे मिळणार आहेत.कॅमेऱ्याची वैशिष्ट्येअधिकाऱ्याच्या खाकी गणवेशाच्या बटणावर हा ८५ क्राईम वजनाचा कॅमेरा बसविता येतो. वायफाय, जीपीएस , ब्लूटूथ सज्ज असा आहे. याशिवाय अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे चित्रीकरण आणि संभाषण हा टिपतो. धूळ, पाणी आणि रात्रीसुद्धा हा सातत्याने कार्यरत राहतो. या कॅमेरामध्ये दहा तासांचे स्टोरेज आहे.
जिल्ह्यात सहा वायुवेग पथकाद्वारे हेल्मेटसह नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरू आहे. त्यासाठी हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत. जिल्ह्यात सध्या सहा पथके कार्यरत असून ती पुढे दहा होण्याची शक्यता आहे. बॉडी- वॉर्न कॅम देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधिन आहे. - रोहित काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर.