कोल्हापूर : दुकानातून साहित्य घेऊन येतो म्हणून मंगळवारी (दि. ३१) घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडलेल्या विक्रमनगरातील तरुणाचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी राजाराम तलावात पाण्यावर तरंगताना मिळून आला. महेश प्रकाश आयरेकर (वय ३४, रा. विक्रमनगर) असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली.
पोेलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश आयरेकर हा अविवाहित असून, तो मंगळवारी दुपारी दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने आपल्या काही नातेवाईकांना दुचाकीवरून जाताना व्हिडीओ पाठवले होते. त्यावरून तो मार्लेश्वर ते रत्नागिरी परिसरात असल्याची माहिती पुढे आली. त्याच रात्री घरच्यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम राबवली.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी त्याचा मृतदेह राजाराम तलावात जॅकवेलनजीक पाण्यावर तरंगताना मिळाला. तसेच त्याची दुचाकी ही तलावाच्या परिसरात उभी होती. पोलिसांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृताच्या खिशात मिळालेल्या मोबाईल व पाकीटमधील ड्रायव्हिंग लायसन्सवरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी नातेवाईकांना येथे बोलावून मृतदेहाची ओळख पटविली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस गंगाराम पाटील तपास करत आहेत.
‘मला माफ कर’ बहिणीला पाठवला मेसेज
महेश हा घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच रात्री उशिरा त्याने ‘मला माफ कर’ असा मेसेज आपल्या बहिणीला मोबाईलवर पाठवला होता. यावेळी त्याने दुचाकीवरील काही व्हिडीओ नातेवाईकांना पाठवले होते. मार्लेश्वर, रत्नागिरी या मार्गावरील ते व्हिडीओ असल्याचे त्याच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितले.
फोटो नं. ०२०९२०२१-कोल-महेश आयरेकर
020921\02kol_12_02092021_5.jpg
फोटो नं. ०२०९२०२१-कोल-महेश आयरेकर