कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील सुलोचना पार्क येथे घरात थाटलेल्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्राचा सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) याला करवीर पोलिसांनी बुधवारी (दि. १७) सायंकाळी फुलेवाडी चौकातून अटक केली. अटकेतील तिन्ही संशयितांनी गेली दीड वर्षापासून अवैध गर्भलिंग निदान केंद्र चालवल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. अटकेतील टेक्निशियन अमित केरबा पाटील (वय ३३, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर) आणि एजंट कृष्णात ऊर्फ सुशांत आनंदा जासूद (वय ३३, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील हा गेली दीड वर्षापासून क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील अमित डोंगरे याच्या घरात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट चालवत होता. बुधवारी सायंकाळी गावाकडे बालिंगा येथे जाण्यासाठी तो फुलेवाडी चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.अमित डोंगरे हा एका हॉस्पिटलमध्ये काम करीत असल्याने त्याला सोनोग्राफी मशीन चालवण्याचे ज्ञान आहे. तिसरा संशयित जासूद हा ग्राहकांचा शोध घेऊन त्यांना मुलगाच होण्याचे औषध दिले जाईल, असे सांगत होता. या तिघांनी गेली दीड वर्षात शंभरहून अधिक महिलांचे गर्भलिंग निदान केल्याचा संशय आहे. पुरावे राहू नयेत, यासाठी त्यांनी तपासणीसाठी येणाऱ्या महिलांचे रजिस्टर ठेवले नाही. संशयितांना सुमारे दोन लाख रुपये किमतीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कोणाकडून मिळाले? गर्भपाताची औषधे कोणाकडून घेतली जात होती? गर्भपात केल्यानंतर भ्रूणांची विल्हेवाट कुठे लावली? याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.राजकीय नेत्यांची वर्दळसंशयितांमधील एजंट कृष्णात जासूद याची पत्नी निगवे दुमाला गावची लोकनियुक्त सरपंच आहे. त्याच्या अटकेनंतर बुधवारी दिवसभर निगवे दुमाला गावातील राजकीय पुढाऱ्यांनी करवीर पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. संशयितांची भेट घेण्यासाठी पुढाऱ्यांची धडपड सुरू होती.एमआर बनला बोगस डॉक्टरबोगस डॉक्टर स्वप्निल पाटील याचे बीएस्सीपर्यंत शिक्षण झाले आहे. काही वर्षे त्याने एका औषध कंपनीत विक्री प्रतिनिधी पदावर काम केले. गेली दीड वर्षापासून त्याने अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे काम सुरू केले. मुलगा होण्याचे औषध देण्याचा दावा तो करीत होता. त्याला सोनाग्राफी मशीन आणि गर्भपाताची औषधे पुरवणाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Kolhapur: गर्भलिंग निदान: मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:30 PM