कोल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषदेसाठी सोमवारी संजय भिकाजी मागाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्जावरील सूचकांनी आपल्या सह्या बोगस असल्याची तक्रार कुरुंदवाड व शिरोळच्या पाच नगरसेवकांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. शहर पोलीस उपअधीक्षक व शाहूपुरी पोलीस ठाण्यातही संबंधितांनी तक्रार दाखल केली आहे.संजय मागाडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर संजय कांबळे, करुणा कांबळे, कुमुदिनी कांबळे, सुरेखा पुजारी, स्नेहल कांबळे आदींच्या सूचक म्हणून सह्या होत्या. हे इतर उमेदवारांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिले. यातील स्नेहल उत्तम कांबळे यांनी या सह्या आमच्या नसून मागाडे यांनी बोगस सह्या मारून फसवणूक केल्याचे प्रतिज्ञापत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
मागाडे यानी निवडणूक आयोगाची फसवणूक केली असून, त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी अशी मागणी स्नेहल कांबळे यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक व शाहूपुरी पोेलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.तक्रारीतील पाच नगरसेवक आघाडीचेजिल्हाधिकाऱ्यांकडे मागाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारे पाच नगरसेवकांपैकी चार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, तर एक कॉंग्रेसचा आहे.तर, आज भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा शौमिका अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे त्यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. या निवडणुकासाठी आज अखेर 5 उमेदवारांची 7 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.