कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेते मंडळींनी बोगस मतदार नोंदणी करून घेण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. याबाबतच्या विविध तक्रारींची चौकशी सुरू असताना, हातकणंगले तालुक्यातील एकट्या अंबप गावातील ४२६ मतदार बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा अहवालच तलाठ्यांनी तहसीलदारांना दिला असून, याबाबत आता मंगळवार, दि. १७ सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी सुनावणी ठेवली आहे.याच गावचे बाळासाे कृष्णा पाटील आणि इतरांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली होती. गावातील मतदार म्हणून ज्या अनेकांची नोंद आहे, असे अनेक नागरिक हे गावात राहत नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार, चौकशीला सुरुवात झाली होती. तहसीलदारांनी याबाबत तलाठ्यांना आदेश देऊन मतदार यादीतील मतदार आणि ते खरोखरच गावात वास्तव्यास आहेत काय, याची खातरजमा करून अहवाल देण्यास सांगितले होते.
त्यानुसार, तलाठ्यांनी स्थानिक पत्त्यावर चौकशी केली असता, प्रत्यक्ष भेट दिल्यानंतरही सुमारे ४२६ जण या पत्त्यावर राहातच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल दिल्यानंतर तहसीलदारांनी आता याबाबत १७ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयात याची सुनावणी लावली आहे. या ४२६ जणांची नावे घालून याबाबत जाहिरातच देण्यात आली असून, त्यांना सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.या सर्वांना मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका, वीजबिल, घरफाळा पावती यांपैकी एका कागदपत्रासह उपस्थित राहण्याची सूचना यामध्ये करण्यात आली आहे. या सुनावणीला जे हजर राहणार नाहीत, त्यांना काही सांगावयाचे नाही, असे समजून त्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कारखान्यांचे कामगार झाले मतदारजिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत विधानसभेची अटीतटीची लढत होणार असल्याने इच्छुकांनी कुठल्याच बाबतीत कसर न ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे साखर कारखान्याशी संबंधित असलेल्या इच्छुकांनी आपल्या मतदारसंघाबाहेरील अनेक कामगारांना मतदारसंघात स्थायिक केले असून, किमान त्यांची कागदपत्रे तरी अद्ययावत करून घेतली आहेत. यावरूनही काही ठिकाणी तक्रारी होण्याची शक्यता असून, खरोखरच जिल्ह्याच्या मतदार यादीची छाननी करण्याचा निर्णय झाला, तर अनेक भानगडी उघडकीस येण्याची शक्यता आहे.