कोल्हापूर : फेसबुकवरून घेतलेले महिलेच्या फोटोचे मॉर्फिंग करून एका भामट्याने अश्लिल फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत ४५ हजार रुपये उकळले. याबाबतची फिर्याद दाम्पत्याने राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. राहूल यादव या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजारामपुरीतील एक सुशिक्षित जोडपे फेसबुकचा वापर करते. त्यावर महिलेने आपले फोटो अपलोड केले आहेत. चार दिवसांपूर्वी संशयित राहूल यादवने संबधित महिलेच्या पतीस फोन करून आमचे हॅकर्स व हॉटेलचे पैसे द्यावेत म्हणून फोनवरून मागणी केली. ते देण्यास संबधितांनी नकार दिला. त्यानंतर त्याच्या फोनवर फोटोचे मॉर्फींग करून त्याचे अश्लिल फोटो तयार करून ते संबधित तरुणाच्या फोनवर पाठविले. हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली.
संबंधित दाम्पंत्याने ऑनलाईन पद्धतीने ४५ हजार रुपये दिले. त्यानंतर ही पैशाची मागणी वाढत गेली. त्यामुळे अखेरीस पिडीत दाम्पत्याने रविवारी (दि.१४) पोलिसांत संशयित राहूल यादववर फिर्याद नोंदविली. त्यानूसार राजारामपुरी पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंदविला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे करीत आहेत.