कोल्हापूर : राजारामपुरी रेल्वे फाटक येथील एका ज्वेलरीच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या मोपेडवर बेवारस सुटकेसमध्ये ‘बॉम्ब’ असल्याच्या वृत्ताने नागरिकांत खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती पोलिसांना देताच त्यांची तारांबळ उडाली. अखेर बॉम्बशोध पथकाने बेवारस सुटकेसची पाहणी केली असता त्यामध्ये बॅँकेचे धनादेश व कागदपत्रे मिळून आली. ही घटना आज, शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. दरम्यान, काही तासांपूर्वी स्टेशन रोडवर मोटारीतून चोरीस गेलेली सुटकेस चोरट्याने याठिकाणी टाकल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर कॉँट्रॅक्टर एम. रेड्डी यांना पोलिसांनी बोलावून घेतले असता त्यांनी सुटकेस आपलीच असल्याचे सांगितले. राजारामपुरी रेल्वे फाटक परिसरातील एका ज्वेलरीच्या दुकानासमोर पार्किंग केलेल्या मोपेडवर बेवारस सुटकेस नागरिकांना दिसून आली. दुकानमालकाने त्यामध्ये ‘बॉम्ब’ असल्याची शक्यता ओळखून शाहूपुरी पोलिसांना कळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. बंदोबस्ताला असणाऱ्या काही पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॉम्बशोध पथकाला पाचारण केले. बॉम्बशोध पथकाने घटनास्थळी येऊन बॅगेची मशीनद्वारे तपासणी केली. त्यामध्ये कोणताही स्फोटक असा सिग्नल न मिळाल्याने ती बॅग उघडली असता त्यामध्ये बँकेचे कागदपत्रे मिळून आले. काही तासांपूर्वी स्टेशन रोडवरून चोरीस गेलेलीच ही सुटकेस असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यानुसार कॉँट्रॅक्टर रेड्डी यांना बोलावून घेतले. त्यांनी सुटकेस पाहताच ती आपली असल्याचे सांगितले. चोरट्याने ती चोरून त्यातील पैसे काढून ती याठिकाणी टाकून दिल्याचे स्पष्ट झाले. सुमारे तासभर सुरू असलेल्या हा थरार नागरिक श्वास रोखून पाहत होते. अखेर त्यामध्ये बॉम्ब नसल्याचे स्पष्ट होताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)
शहरात ‘बॉम्ब’च्या अफवेने उडाली खळबळ
By admin | Published: January 04, 2015 1:16 AM