सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे सापडलेले बॉम्बसदृश स्फोटक कवलापुरातच चार फूट खड्डा खोदून सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले आहे. लष्कराशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आहे, पण अजूनही त्यांचे अधिकारी सांगलीत दाखल झालेले नाहीत. कवलापुरातील सुकुमार आष्टेकर यांच्या बिसूर रस्त्यावरील शेतात नांगरताना बॉम्बसदृश स्फोटक सापडले होते. हे स्फोटक चार ते पाच किलोचे आहे. त्याचा लष्करात वापर केला जातो. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारीच लष्कराच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी याचा अहवाल जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना सादर केला आहे. गायकवाड यांनी लष्कराच्या पुणे कार्यालयात हा अहवाल सादर केला आहे.ग्रामीण पोलिसांचे पथकही शुक्रवारी थेट पुणे येथे लष्कराच्या कार्यालयात रवाना झाले आहे. कदातिच त्यांच्यासोबत पथक उद्या (शनिवारी) येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत हा बॉम्ब कवलापुरातच चार फुटाचा खड्डा खोदून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
सापडलेला बॉम्ब कवलापुरात ठेवला
By admin | Published: March 05, 2016 12:20 AM