कोल्हापूर : तपोवन मैदानात झाडीत टाकलेली हाडांची बॅग कुत्र्यांनी ओढून आणल्याचे लक्षात येताच तिथे खेळणाऱ्या तरुणांनी जुना राजवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून तपासणीसाठी हाडे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली. मानवी हाडे असल्याचा प्राथमिक संशय असून, ही बॅग कोणी आणून टाकली, याचा शोध घेण्याचे काम जुना राजवाडा पोलिसांकडून सुरू आहे. हा प्रकार रविवारी (दि. २१) दुपारी घडला.याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी तपोवन मैदानावर खेळणाऱ्या मुलांना काही कुत्र्यांनी ओढून आणलेली बॅग दिसली. त्या बॅगेत हाताची, पायाची आणि अन्य अवयवांची हाडे होती. मानवी हाडे असल्याचा संशय बळावताच तरुणांनी जुना राजवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे, सहायक पोलिस निरीक्षक सागर यांच्यासह पोलिस तपोवन मैदानात दाखल झाले. सीपीआरचे वैद्यकीय अधिकारी आणि फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलवले. संबंधित हाडे मानवी सांगाड्यातील असावित, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, ती कधी टाकली असावीत? महिलेची आहेत की पुरुषाची आहेत? त्याचे वयोमान? याचा शोध घेण्यासाठी हाडे फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती निरीक्षक झाडे यांनी दिली. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली असून, बॅग टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलिस हवालदार नामदेव पाटील, ज्ञानेश्वर राऊत, सागर डोंगरे, अमर पाटील, योगेश गोसावी घटनास्थळी उपस्थित होते.बॅग नेमकी कोणी टाकली?बॅगेतील हाडांवर काही नंबर लिहिलेले दिसत आहेत. त्यावरून एखाद्या प्रयोगशाळेतील हाडांचा सांगाडा खराब झाल्यानंतर त्यातील हाडे बॅगेत भरून टाकली आहेत काय? किंवा जादूटोण्यासाठी त्याचा वापर झाला आहे काय? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
घटनेने खळबळबॅग भरून हाडे सापडल्यामुळे तपोवन परिसरात खळबळ उडाली. संबंधित हाडे नेमकी कशाची आहेत, याचा उलगडा होत नसल्याने परिसरात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या मनात या घटनेमुळे भीती निर्माण झाली.