कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मोहन शिवाजी दळवी (वय ३१, रा. बोंगेवाडी, ता. पन्हाळा) याला जिल्हा न्यायालयाने सुनावलेली पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अपिलात जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी कायम केली. सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, दि. ९ एप्रिल २००३ रोजी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरोधात दळवी याने लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी मोहन दळवी याला कोडोली पोलिसांनी अटक करुन त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याबाबतच्या खटल्यात दळवी याला जिल्हा न्यायाधिशांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरुध्द आरोपी दळवी याने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात क्रिमीनल अपील दाखल केले, त्याविषयी सुनावणी होऊन आरोपीचे वकील व फिर्यादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील शुक्ल यांचा युक्तीवाद झाला. या अपिलामध्ये सरकारी वकिलांचा युक्तीवाद विचारात घेऊन न्यायालयाने अपील फेटाळून लावले व आरोपीला दोषी ठरवले. या कामी कोडोली पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरवी अधिकारी उदय पाटील यांची मदत महत्त्वपूर्ण ठरली.