संतोष मिठारीकोल्हापूर : बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्थेने वेगळा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या दहा रुपयांत पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून लोकवर्गणी आणि देणगीतून हा उपक्रम राबविला जात आहे.सध्या सोशल मीडियाच्या युगात बहुतांश बालके वाचनापासून दूर जात आहेत. अशा स्थितीत त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने या संस्थेने दि. १५ आॅगस्ट २०१० रोजी अवघ्या ‘दहा रुपयांत पुस्तके’ हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी या संस्थेने मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडाची निर्मिती केली.
या उपक्रमांतर्गत विविध स्वरूपांतील २५ पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगुप्पे, सुभाष विभूते, पृथ्वीराज तौर, सुनील सुतार, चंद्रकांत निकाडे, फारूक काझी, पी. जे. कांबळे, डॉ. शिवशंकर उपासे, बाळ पोतदार, माधुरी माटे, सावित्री जगदाळे, आदी लेखक-लेखिकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.
ही पुस्तके महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचविली जातात. मराठीमध्ये बालसाहित्य प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी आहे. अशा स्थितीत अल्प किमतीमध्ये बालकांसाठी दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील हा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे.
आतापर्यंत एक लाख पुस्तकांची विक्री‘अवघ्या दहा रुपयांत पुस्तके’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत एक लाख पुस्तकांची विक्री झाली आहे, असे चैतन्य सृजन व सेवा संस्थेचे खजिनदार सुभाष विभूते यांनी सांगितले.
ते म्हणाले, बालकांसाठी अल्प मूल्यामध्ये संपूर्ण रंगीत पुस्तके प्रकाशित करणार आहोत. देशातील विविध भाषांतील बालसाहित्याचा परिचय व्हावा, म्हणून सुमारे वीस भाषांतील कथा निवडून संस्थेतर्फे उज्ज्वला केळकर यांनी त्यांचा मराठीत अनुवाद केला आहे. राजा शिरगुप्पे, कृष्णात खोत, पृथ्वीराज तौर, आदींची पुस्तके पॉकेट बुक स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. महात्मा गांधीजी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.
बालवाङ्मयातील पहिलीच कल्पनालेखक फारूक काझी यांचे ‘मित्र’ हे पुस्तक क्यूआर कोडच्या साहाय्याने मोबाईलमध्ये आॅडिओ बुक स्वरूपात तयार केले आहे. मराठी बालवाङ्मयातील ही पहिलीच कल्पना आहे. कवयित्री माया धुप्पड यांचा ‘गरगर घागर’ कथाकाव्यसंग्रहही आॅडिओ बुकमध्ये उपलब्ध आहे. त्यातील गीते बालक आणि गायकांनी गायलेली आहेत.