दत्ता बिडकर।हातकणंगले : तालुक्यातील गायरान, मुलकीपड आणि डोंगर उताराच्या पडीक जमिनींतून हजारो ब्रास गौण खनिजाची लूट सुरू आहे. ठेकेदार आणि राजकीय मंडळीच्या मदतीला एजंटांची टोळी या गौण खनिज उत्खननामध्ये उतरल्यामुळे १00-२00 ब्रासची शासकीय रॉयल्टी भरून हजारो ब्रास दगड-माती आणि मुरुमाची लूट करण्याचे प्रकार महसूल विभागाच्या साक्षीने सुरू आहेत.
शासनाची लाखो रुपये रॉयल्टी बुडवून गौण खनिजाची लूट होत असताना तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी मात्र याकडे डोळेझाक करीत असल्यामुळे अव्वल कारकूनच गौण खनिजाच्या माफियामध्ये अव्वल ठरत आहे.
तालुक्यामध्ये गायरान, मुलकी पड आणि डोंगर उतारावर पडीक जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. अशा जमिनींमधून मोठ्या प्रमाणात दगड, माती आणि मुरुमाची राजरोसपणे लूट सुरू आहे. गावपातळीवर तलाठी आणि मंडलाधिकारी यांना हाताशी धरून वरील मालकी हक्काच्या जमिनीचे ७-१२ काढून त्यांचे पंचनामे करून नाममात्र चलने भरायची. त्यांची १00-२00 ब्रासची शासन रॉयल्टी भरून राजरोसपणे हजारो ब्रास गौण खनिजाची संगनमताने लूट केली जात आहे.दगड, मुरूम आणि मातीच्या भरावासाठी रॉयल्टी बुडवून गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी नवनवे फंडे वापरून एजंट मंडळींची तलाठी, मंडलाधिकारी ते अव्वल कारकून अशी महसूल विभागामध्ये साखळीच तयार झाली आहे.
रॉयल्टी परवाने मिळवून देण्यासाठी तालुक्यातील शासकीय, निमशाकीय रस्त्याचे ठेकेदार, औद्योगिक वसाहतीसह इतर ठिकाणच्या नवीन तयार होणाऱ्या कारखान्यांचे कारखानदार, इचलकरंजी आणि जयसिंगपूर शहर आणि तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीमध्ये घरे तयार करून देणाºया बिल्डर लॉबीकडून ज्या-त्या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या पद्धतीने एजंटांची टीमच तयार ठेवलेली आहे. काही परवान्यांमध्ये शासकीय अडचणी निर्माण झाल्या, तर या ठिकाणी राजकीय मंडळीच्या वजनाचा वापर करण्याचा फंडाही वापरला जातो.
तालुक्यातील टोप, संभापूर, वडगाव, आळते, मजले, रेंदाळ, पट्टणकोडोली या परिसरातील अनेक खडी क्रशरला प्रदूषण मंडळासह खनिकर्म विभागाची कोणतीही परवानगी नसताना या क्रशरवरून बिनदिक्कत रॉयल्टीचे पास महसूल विभागाकडून दिले जातात.
इचलकरंजी शहराजवळील तिळवणी, तारदाळ, खोतवाडी, साजणी, माणगाव, हातकणंगले, माणगाववाडी या गावांमधील पडीक जमिनीवरील मुरुमाची मोठ्या प्रमाणात लूट करणारी माफिया टोळी सक्रीय आहे. शंभर ब्रासची गौण खनीज रॉयल्टी भरायची आणि हजारो ब्रास मुरुमाची लूट करायची यासाठी दिवस-रात्र काम करणारी एजंटांची यंत्रणा सक्रीय असताना तहसीलदार, प्रांताधिकारी आणि मंडलाधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्यामुळे अव्वल कारकून या गौण खनिजाच्या लुटीमध्ये अव्वल ठरत आहे.अव्वल कारकूनच व्यवहारात अव्वलगौण खनिजाच्या रॉयल्टी प्रकरणामध्ये तलाठी, मंडलाधिकारी यांचे पंचनामे मॅनेज करण्यापासून रॉयल्टीची चलने पास करून घेण्यासाठी काम करणारे एजंट महसूल विभागामध्ये पोहोचण्याअगोदर तहसील कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या स्कोडा गाडीमध्ये वाटाघाटी, रॉयल्टी पास आणि शासकीय रजिस्टरची खातरजमा करूनच कार्यालयामध्ये पोहोचत असल्यामुळे रॉयल्टीची लढाई जिंकल्याचा विजय त्यांच्या चेहºयावर उमटतो.