कोल्हापूर : सीमा भागातील बांधवांना एकाकी पडू देणार नाही, सीमा लढा अधिक व्यापक करण्यासाठी कोल्हापुरात लवकरच सीमा लढा परिषदेचे आयोजन करणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केली.राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंचच्या वतीने मंगळवारी बिंदू चौकात १७ जानेवारी १९५६ ला बेळगावमध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या लढ्यातील हुताम्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी मुळीक बोलत होते. मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले, यावेळी ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रेहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेलमें’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे म्हणाले, कोल्हापूरची जनता नेहमीच सीमा भागातील जनतेच्या सोबत राहिली आहे. कोल्हापूरसह पुणे, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राने सीमा लढ्यात लक्ष दिले नाही. आगामी काळात काेल्हापूरकरांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात सीमा लढा परिषदेचे आयोजन करावे.एस. जी. देसाई, दत्ता उघाडे, सी. एम. गायकवाड, डी. जी. भास्कर यांनी मनोगत व्यक्त केले. मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, विकास कलगुटगी, ॲड. महेश बिरजे, महादेव मंगनाकर, महादेव मरगांचे, डॉ गिरीश कोरे, छगन नांगरे, शैलजा भोसले, उषाताई लांडे, संजीवनी चौगुले, अनुराधा घोरपडे, शांताबाई पाटील, मेघना साळुंखे, संगीता घोरपडे, मिलन मुळीक, महेश मचले, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, अमरसिंह रजपूत, सहदेव गुरव, संजय कांबळे, राजू माने, अशोक माळी, महादेव पाटील, फिरोज खान, उमेश बुधले, विजय पाटील, राजू परांडेकर आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात लवकरच सीमा लढा परिषद, मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 3:35 PM