कोल्हापूर : मुंबईच्या सराफ व्यापा-याला बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील ४० लाख रुपये किमतीचे एक किलो सोन्याचे दागिने चौघांनी लुटले. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शहरातील गुजरीमधील ‘मरुधन भवन’ या यात्री निवासासमोर ही घटना घडली. सीसीटीव्ही फूटेजमध्ये अवघ्या काही मिनिटांत लूटमार करून चोरटे पसार झाल्याचे दिसत आहेत. त्यावरून पोलिसांची आठ विशेष पथके चोरट्यांचा माग काढत आहेत.कांतिलाल जसवंतराज मेहता (वय ५३, रा. गोकूळ को-आॅप. हाउसिंग सोसायटी, एम.जी. रोड, बोरीवली (पूर्व) मुंबई) हे सोन्याचे होलसेल व्यापारी आहेत. बुधवारी पहाटे खासगी आरामबसने ते मध्यवर्ती बस स्थानक येथे आले. तेथून रिक्षाने गुजरीतील जैन श्वेतांबर मंदिरानजीक ६च्या सुमारास उतरले. बाहेरूनच दर्शन घेऊन ते चालत मरुधन भवनसमोर आले. या वेळी पाठीमागून दोघे जण आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवीत बांबूच्या काठीने त्यांना मारहाण केली. या वेळी समोरून दोघे तरुण आले. या चौघांनी त्यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या हातातील बॅग हिसकावून कपिलतीर्थ मार्केटच्या दिशेने पलायन केले.भांबावलेल्या मेहता यांनी आरडाओरड करताच यात्री निवासमधील वॉचमन बाहेर पळत आला. मेहता यांनी मित्र रणजीत पारीख यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. पारीख यांनी थेट जुना राजवाडा पोलीस ठाणे गाठले.>तपासाची सूत्रे कोल्हापूर ते मुंबईचौघेही लुटारू २५ ते ३० वर्षे वयाचे आहेत. दोघांनी डोक्याला माकडटोपी घातली आहे; तर दोघांच्या अंगात जॅकेट आहे. एक जण अंगाने सडपातळ, तर तिघे जण मध्यम आहेत. एकाच्या गळ्यात सोन्याचे लॉकेट आहे. चौघेही सुशिक्षित आहेत. मेहता दर बुधवारी मुंबईहून कोल्हापुरात येतात, त्याची माहिती या चौघांना आहे. यामध्ये काही सराफांचाही हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. पाळत ठेवून ही लूटमार केली आहे. मेहता यांचे मोबाइल कोणाकोणाला झाले, त्याची माहिती पोलीस घेत आहेत. कोल्हापूर ते मुंबई अशी तपासाची सूत्रे फिरली आहेत.>लुटारूंचे कर्नाटकच्या दिशेने पलायन : लूटमारीच्या घटनेनंतर चोरटे कर्नाटकच्या दिशेने पसार झाले असण्याची शक्यता आहे. या लूटमारीमध्ये चौघे नसून आणखी काही साथीदारांचा समावेश असण्याची शंका पोलिसांना आहे. दोन वाहनांचा वापर त्यासाठी झाल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.
बोरिवलीच्या सराफाला कोल्हापुरात ४० लाखांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:02 AM