एकनाथ पाटील।
नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर पूर्वनियोजित सापळा रचून लाचखोरास पकडले जाते. त्यानंतर तक्रारदाराचे जे शासकीय काम आहे त्यामध्ये अडवणूक होऊ नये याची दक्षता घेतली जाते.
कोल्हापूर : महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगर भूमापन, बँका, रजिस्ट्रेशन, अन्न व औषध प्रशासन, कारागृह, महावितरण, आदींसह शासकीय कार्यालयांत कामाच्या मोबदल्यात लाच स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यातील आठ परिक्षेत्रांमध्ये एकमेव पुणे परिक्षेत्रातील कोल्हापूर विभागाचा कारवाईचा टप्पा सर्वाधिक आहे; त्यामुळे कोल्हापुरात लाचखोरांची संख्या जास्त असल्याचे कागदोपत्री स्पष्ट होते. नुकताच कोल्हापूर ‘एसीबी’चा पदभार उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी स्वीकारला. त्यांनी ‘एसीबी’च्या मुंबई-वरळी येथील मुख्यालयात एक वर्ष पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. पोलीस उपनिरीक्षक ते उपअधीक्षक असा त्यांचा प्रवास गेल्या २५ वर्षांचा आहे. त्यांच्याशी साधलेला संवाद ....
प्रश्न : जिल्ह्यात लाचखोरांचा टक्का वाढतोय काय?उत्तर : कमी श्रमात जास्त पैसे मिळविणे, तत्काळ जामीन मिळत असल्याने कायद्याचा धाक नाही, वरिष्ठांचे दुर्लक्ष, दहांपैकी एकच व्यक्ती तक्रार देण्यास पुढे येतो अन्य नऊजण पैसे (लाच) देऊन कामे करून घेतात. या सर्व कारणांमुळे शेकडो कारवाई होत असल्या तरी शासकीय कार्यालयात लाच स्वीकारण्याचा फंडा काही कमी झालेला नाही.
प्रश्न : लाचेच्या तक्रारी येण्यासाठी काय केले जाते.उत्तर : लाच देऊ नये, लाच देणे आणि घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे, अशा पद्धतीने नागरिकांत प्रबोधन केले जात आहे. पोस्टरबाजी, पत्रकबाजी, प्रसारमाध्यमांतूनही जनजागृती केली जाते. तसेच वर्षभरातील तक्रारदारांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रश्न : नागरिकांना काय संदेश द्याल?उत्तर : लोकांनी निर्भयपणे तक्रार देण्यास पुढे यावे, आम्ही स्वत:हून प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन प्रलंबित प्रकरणांसाठी उंबरे झिजविणाºया नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देत आहोत; त्यामुळे सध्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाºया लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी टोल फ्री १०६४ व मोबाईल नंबर ७०८३६६८३३३, ९०११२२८३३३, कार्यालय-(०२३१-२५४०९८९), व्हॉटस अॅप-७८७५३३३३३३ संपर्क साधण्याबाबत पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात आली आहे.