लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील बोरवडे गावचा विकास आराखडा लवकरच राज्य व केंद्र शासनाला सादर करणार अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कला संचालनालयाचे संचालक आणि वास्तुकला महाविद्यालय मुंबईचे प्राचार्य राजीव मिश्रा यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण भागातील गावातील विकासाचा आराखडा प्रत्यक्ष गाव भेट देत नागरिक, महिला आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग घेत यासंबंधी गावांमध्ये अपूर्ण विकासकामांची माहिती, कामांसाठी उपलब्ध जागेची पाहणी आणि विविध विकास आराखडा राबवत असताना त्यामध्ये सर्वांचा सहभाग याचा प्राधान्याने विचार करीत आराखडा करण्यात येत असल्याचे श्री. मिश्रा यांनी यावेळी सांगितले.
आराखडा तयार करताना राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालय आणि केंद्रातील ग्रामीण मंत्रालय यांच्याकडे हा अहवाल देण्यात येणार आहे. त्यानुसार प्राधान्याने कोणत्या योजनेला अनुदान लवकर देत तो प्रश्न सोडविता येईल याचा विचार होतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आणि अन्य समस्या व त्यासाठी सहकार्य केंद्र, राज्य शासन गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करते. आराखडा तयार करीत असताना रविवारी बोरवडे गावाला भेट दिली. सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. वास्तुकला महाविद्यालय मुंबईचे पाच मुले, चार मुली यांनी सहभाग घेत गावातील विविध घटकांचा नागरिक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. काही ठिकाणी भेटी देऊन हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे, लोकनियुक्त सरपंच गणपतराव फराकटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपकार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, ग्रामसेवक बी. के. कांबळे, आदींनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे श्री. मिश्रा यांनी सांगितले. अशाच पद्धतीने राज्यातील दुसरे गाव गुहा (ता. राहुरी) याचीही निवड केली आहे. त्या ठिकाणांची माहिती घेतली असून, लवकरच राज्यातील या दोन गावांचा विकास संकल्प आराखडा केंद्र व राज्य शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बोरवडे येथील भेटीत जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे, लोकनियुक्त सरपंच गणपतराव फराकटे, उपसरपंच मंगल साठे, पंचायत समिती सदस्य माजी रघुनाथ कुंभार, साताप्पा साठे, रमेश चौगुले, प्रकाश सूर्यवंशी, पांडुरंग खाडे, राजेंद्र जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. .......