लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील आमराई रोड परिसरात झालेल्या युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अवघ्या २४ तासांत छडा लावत या खूनप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांनी किरकोळ कारणातून झालेल्या वादातून किशोर महालिंग भोसले (वय २८, रा. एसआरपीएफ क्वॉर्टर्स सोरेगाव, जि. सोलापूर) याचा खून केला असल्याची कबुली दिली आहे.
युवराज परशुराम पवार (वय २०) व रोहित युवराज थडके (वय १८, दोघे रा. साईट नं. १०२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, ३ मे रोजी संध्याकाळी आमराई रोड परिसरात असलेल्या एका विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर मारहाणीच्या व डोक्यात जड वस्तूने प्रहार केल्याच्या खुणा आढळून आल्याने त्या युवकाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. तो मृतदेह किशोर महालिंग भोसले याचा असल्याचा तपास पोलिसांनी केला. त्यानंतर खून झाल्याच्या दृष्टीने तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना घटना घडण्याच्या दोन दिवसआधी किशोर याचे दोघांबरोबर भांडण झाले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाद्वारे साईट नं. १०२ परिसरातील युवराज पवार व रोहित थडके या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनीच भोसले याचा खून केल्याची कबुली दिली. त्यामध्ये शनिवारी (दि. १) दुपारच्या सुमारास तिघे घटनास्थळी गेले होते. त्या ठिकाणी तिघांमध्ये शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद झाला. त्या वादातूनच युवराज पवार याने भोसले याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारले. वर्मी घाव बसल्याने किशोर हा ठार झाला. त्यानंतर पवार व थडके या दोघांनी मिळून भोसले याला उचलून विहिरीत फेकून दिले असल्याची कबुली त्यांनी दिली.
खुनाचा छडा लावण्याची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस नाईक संजय इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल आयुब गडकरी, अमर शिरढोणे, महेश खोत, फिरोज बेग, सूरज चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल कनवाडे, चालक पोलीस नाईक यशवंत कुंभार यांच्या पथकाने केली.
मृत किशोरही गुन्हेगार
मृत किशोर भोसले हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सोरेगाव येथील आहे. कामाच्या निमित्ताने तो इचलकरंजीत आला होता. त्याच्यावर पंढरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून, तो इचलकरंजीत अक्षय भोसले या नावाने रहात होता.