संतोष मिठारी , कोल्हापूर : अवघ्या २५ दिवसांवर पदवीधर मतदारसंघातील निवडणूक असतानाच राष्ट्रवादीकडून पुणे मतदारसंघातून सारंग पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बंडखोरीचे ग्रहण या पक्षांना लागले आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी’चे अरुण लाड आणि काँग्रेसचे सम्राट शिंदे हे बंडांचा झेंडा खांद्यावर घेणार आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केली. त्यापाठोपाठ विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून दुसर्यांदा बाजी मारण्यासाठी भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रातील धर्मेंद्र पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले. गेल्या चार महिन्यांपूर्वीच या निवडणुकीच्या रिंगणातील हे तीन उमेदवार पक्के झाले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून निव्वळ उमेदवारीबाबत अनेकांच्या नावांची चर्चा रंगली होती. त्यात राष्ट्रवादीकडून गेल्यावर्षी निवडणूक लढविलेले कºहाडचे राजेश पाटील-वाठारकर, पुण्यातील शरद बुट्टे-पाटील, सांगली जिल्ह्यातील क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांची नावे होती. तसेच काँग्रेसकडून विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे भाचे प्रा. सम्राटसिंह शिंदे, कोल्हापूरचे माणिक पाटील-चुयेकर आणि सोलापूरच्या शैला गोडसे यांची नावे चर्चेत होती. आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असे गृहीत धरून यातील काहीजणांनी मतदार नोंदणी, त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या. मात्र, या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सारंग पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने नावांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. तरीही बंडखोरीचे ग्रहण काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरणार. त्यात सहा महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीला लागलेले अरुण लाड हे राष्ट्रवादीतून, तर काँग्रेसमधून प्रा. सम्राट शिंदे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. पक्षाकडून तिकीट मिळाले नसल्याने प्रा. शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे निश्चित केले. शुक्रवारी (दि. ३०) शिंदे हे उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. तसेच लाड हेही रिंगणात उतरणार आहेत. मात्र, त्याबाबत दोन दिवसांत ते निर्णय अधिकृतपणे जाहीर करणार आहेत.
दोन्ही काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण!
By admin | Published: May 27, 2014 12:46 AM